ACB Ahmednagar ः नेवासा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक तुकाराम भीमराव खेडकर (वय 35, मूळ रा. कोनोशी, ता. शेवगाव), त्याचे खासगी सहकारी नंदू पांडुरंग सरोदे (रा. देवसडे, ता. नेवासा) आणि पोपट सरोदे या तिघांना पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नगर पथकाने कारवाई करत या तिघांविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये सहकार्य करण्यासाठी नंदू सरोदे आणि पोलीस नाईक तुकाराम खेडकर याने तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार याने 12 एप्रिलला नगरच्या पथकाकडे तक्रार केली. याच दिवशी पथकाने पडताळणी केली. लाचेच्या एकूण 10 हजार रुपयांच्या रकमेत तडजोड होऊन आठ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. यात पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे ठरले. ही लाचेची रक्कम 16 एप्रिलला स्वीकारण्याचे ठरले.
पोलीस नाईक तुकाराम खेडकर याने नगरच्या पथकाबरोबर असलेल्या पंचासमक्ष पाच हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारली. या लाच स्वीकारल्याप्रकरणी पोलीस नाईक खेडकर, नंदू सरोदे आणि पोपट सरोदे या तिघांविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, सरकारी कर्मचारी, अधिकारी यांनी किंवा खासगी व्यक्तीमार्फत नागरिकांचे काम करण्याच्या मोबदल्यात पैशांची मागणी केल्यास त्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करा. अशा सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्याविरोधात फौजदारी कारवाई केली जाईल. यासाठी लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा (0241) 2423677 किंवा टोल फ्रि क्रमांक 1064 यावर तक्रार नोंदवता येईल.