Nagar District Cooperative Bank ः सरकारने दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांकडून त्यांना अनुज्ञेय प्रोत्साहनपर व्याज अनुदान रक्कम वजा करून परत फेडीची रक्कम वसूल करण्याचा निर्णय 27 मार्चला सहकार आयुक्तांनी घेतला. यानुसार नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा चालू अथकीत वसुलास पात्र पिक कर्ज वसुलीबाबत फक्त मुद्दल कर्ज वसूल करणेबाबत निर्णय झाला आहे. या निर्णयाची माहिती नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखांना सविस्तर सूचना कळविल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी आधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली.
नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चालू वर्षात 2 हजार 995 कोटीचे कर्ज वाटप केले आहे. या चालू वर्षात आज अखेर 4 हजार 674 कोटीचे पिक वसुलास पात्र आहेत. त्यातील 3 हजार 833 कोटीचे येणे बाकी कर्ज आहे. सद्यस्थितीत गेल्यावर्षीच्या तुलनेत बँकेची वसुली कमी प्रमाणात होत आहे. सरकारकडून शेतक-यांना प्रोत्साहनपर व्याज अनुदान देणे कामी योजने अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारकडून बँकेला 2019-2020 ते आजपर्यंत 176 कोटीचे व्याज परतावा अद्यापही जमा झालेला नाही. तसेच राज्य सरकारकजून डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत परतावा योजनेअंतर्गत कर्जदार शेतक-यांना देण्यात येणारे व्याज सवलत सन 2021 पासूनची 4 लाख 1 हजार 599 सभासदांचे 99 कोटी 75 लाखाचे व्याज सरकारकडून अद्यापही जमा झालेला नाही.
बँक ठेवीदाराच्या पैशातूनच सर्व प्रकारचे कर्ज वाटप करीत असल्याने आणि बँकेस ठेवीदारांना मात्र, त्यांच्या ठेवी व ठेवीवरील व्याज नियमित द्यावे लागते. सरकारकडून व्याज परतावा वेळेत न आल्याने बँकेवर व प्राथमिक विविध कार्यकारी सेवा संस्थावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. सरकारने वेळेत व्याज परतावे जमा दिल्यास बँक व विविध कार्यकारी सेवा संस्थांची आर्थिक नुकसान होणार नाही. याबाबत बँक सरकारकडे सतत पाठपुरावा करीत आहे, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली.