Nagar Sugar Factori News : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळख असलेल्या राहुरीतील डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालवायला देण्याचे जवळपास निश्चित झाले. नगर जिल्हा सहकारी बँकेच्या शुक्रवारी (ता. २३) अजेंड्यावर विषय क्रमांक १९ वर तसा विषय बँकेने घेतला होता. हा ठराव बैठकीमध्ये मंजूर करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली असून, हा कारखाना २५ वर्षासाठी भाडेतत्वावर देण्याचे ठरले आहे. कारखाना पुणे येथील उद्योगपती श्रीयुत् दुग्गड अँड कंपनीला देण्याचे निश्चित झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.
तनपुरे सहकारी कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयावरून राहुरी तालुक्यातील शेतकरी सभासद व कामगार संघटना यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरून संघर्ष उफाळून येण्याची शक्यता असून, त्याला राजकीय किनार मिळू शकते. त्यामुळे हा संघर्ष टोकाचे असले, असे जाणकारांचे म्हणणे आहे. कारखाना भाडेततत्वावर जाण्याच्या निर्णयामुळे शेतकरी आणि कामगार यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या निर्णयाला विरोधाची शक्यता वाढली आहे. यातच कारखाना बचाव कृती समितीने उच्च न्यायालय खांडपीठात याचिका दाखल केली असून हा कारखाना शेतकरी सभासद आणि कामगार संघटना यांच्या मालकीचा राहावा म्हणून सातत्याने प्रयत्न करीत आहे. तसे न झाल्यास कारखाना बचाव कृती समिती तालुक्यात शेतकरी सभासद कामगार संघटना मोठ्या संख्येने आंदोलन करतील, असा इशारा राहुरी तालुका कारखाना बचाव कृती समिती सदस्य व शेतकऱ्यांनी दिला आहे.
नगर जिल्हा सहकारी बँकेने सदरचा ठराव मंजूर करू नये तसेच सदरचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी अमृत धुमाळ, अरुण पाटील कडू, पंढरीनाथ पवार, राजुभाऊ शेटे, संजय पोटे, दिलीप इंगळे, कोंडा पाटील विटनोर, सुखदेव मुसमाडे, भगवान गडाख, अप्पासाहेब ढूस, सुभाष करपे, भारत पेरणे तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
–