Ahmednagar Police ः लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होईल. प्रशासन सज्ज होऊ लागले आहेत. नगर जिल्हा पोलीस दल देखील अपडेट होत आहे. समाजकंटकांची माहिती घेऊन त्यांच्यावर तडीपारीची, प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी सुरू केली आहे. तसेच नगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर देखील छापेमारी सुरू केली आहे.
नगर जिल्हा पोलिसांनी या फेब्रुवारी महिन्यात १२६ अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करत १४३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करत ७ लाख ४० हजार ६२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करत ८६ ठिकाणी छापे घातले. या कारवाईत त्यांच्याकडून ५ लाख २५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच गावठी दारू आणि कच्चे रसायनाची नशा करणाऱ्यांविरोधात ८७ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आली. जुगार, मटका, बिंगो चालविणार्या ४० ठिकाणी कारवाई करत २ लाख १५ हजार ५२० रुपये आणि जुगाराची साधने जप्त करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.
तसेच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नगर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार, समाजकंटक यांच्याविरोधात देखील प्रतिबंधात्मक, तडीपारीची कारवाईची तयारी नगर जिल्हा पोलीस दलाने सुरू केली आहे. तशी यादी तयार केली जात आहे. नगर जिल्हा पोलीस मुख्यालयातून स्थानिक पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी याबाबत तशा सूचना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.