भारतीय जनता पक्षाचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांना देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र माेदी यांना बघायचे आहे. नरेंद्र माेदी हे देशाचे पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी जीवाचे रान करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी लाेकसभा निवडणुकीत पक्ष जी जबाबदारी देईल, ती आपण पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमाेर त्यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यात पक्षाचे कामकाजात आम्ही सर्व एकमेकांना सांभाळत आहाेत. आपण आम्हाला सांभाळावे, अशी विनंती देखील खासदार विखे पाटील यांनी यावेळी प्रदेशाध्यक्षकांना केली.
अहमदनगरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महाविजय 2024 लोकसभा प्रवास कार्यकर्ता ही कार्यशाळा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. माजी मंत्री आमदार प्रा.राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, भाजपचे महामंत्री विजय चौधरी, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, महेंद्र गंधे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना विराजमान करावयाचे आहे. तसेच आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर सुजय विखे पाटील यांना पुन्हा लोकसभेत पाठविण्याचा निर्धार आपण सर्वांनी या कार्यशाळेत करावा, असे सांगितले. देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. घरोघरी जावून नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल सांगावे. मोदीजी यांनी गरीब कल्याणाकरिता राबविलेल्या योजनाबद्दल जनजागृती करावी. मोदीजी आता विश्वाचे नेते झाले असून जी-20 या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वीतून सिद्ध झाल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
यावेळी शिवाजी कर्डिले, प्रा.राम शिंदे यांची भाषणे झाली. या कार्यशाळेस भाजपचे पदाधिकारी, विधानसभा प्रमुख, बूथ प्रमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.