Nagar Political : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशावर भाष्य केले. तसेच लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत भूमिका मांडली. “राजकारण कोणत्या वळणावर नेईल, हे सांगता येत नाही. राजकारणात काही गोष्टी घडत असताना त्यावर अगोदर भाष्य करणे योग्य नाही. पुलाखालून बरेच पाणी जायचे आहे”, अशी भूमिका मांडून राजकीय डावपेच आमदार लंके यांनी कायम ठेवले आहे. आमदार लंके यांची ही भूमिका म्हणजे, राजकीय दबावाचा भाग असल्याचे राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे.
आमदार नीलेश लंके यांचा वाढदिवस काल कार्यकर्त्यांनी साजरा केला. हे करताना कार्यकर्त्यांनी दिल्ली अब दूर नही.., अशी जाहिरातबाजी केली. यानंतर आमदार लंके आज पुण्याच्या दिशेने रवाना झाले. यातच पुण्यात शरद पवार यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यामुळे आमदार लंके शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असे वृत्त येऊ लागले. परंतु शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आमदार लंके यांच्या पक्ष प्रवेशाचा विषय एका वाक्यात संपवला. तोच खासदार अमोल कोल्हे यांची आमदार लंके यांनी भेट घेतली. खासदार कोल्हे यांनी या भेटीनंतर वेट अॅण्ड वाॅच असे सांगून कुठेतरी राजकीय पाणी मुरते आहे, अशा चर्चांना बळ दिले. यानंतर आता आमदार लंके यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे.
आमदार लंके म्हणाले, राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जायचे असे अजून काही ठरले नाही. राजकारण क्षणाला बदल आहे. त्यामुळे पुढल्या कोणत्याही गोष्टींवर चर्चा करण्यात अर्थ नाही. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी नगर दक्षिणमध्ये मित्रांच्या सहकार्याने संपर्क वाढवला आहे. तशी मी निवडणूक लढवावी, अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण अजून तरी निवडणूक लढवण्याबाबत निर्णय झालेला नाही. राजकारण कोणत्या वळणावर जाईल हे सांगता येत नाही. राजकारणात काही गोष्टी घडण्याअगोदर बोलणे योग्य नाही. अजून पुलाखालून बरेच पाणी जायचे आहे”. पक्षाने जबाबदारी दिल्यास, तयारीतच आहे. आपण खेळाडू आहे. आपण नेहमीच ग्राऊंडवर असतो, असेही देखील आमदार लंके म्हणाले.
नगर दक्षिणमध्ये खासदार सुजय विखे हे भाजपचे उमेदवार आहेत. त्यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात केलेल्या विकासकामांकडे कसे पाहाता? यावर आमदार लंके म्हणाले, “आपण आपल्या कामाला महत्त्व देतो. त्याची रेष पुसण्यापेक्षा आपली रेष वाढवत राहायची. त्यामुळे दुसऱ्यांकडे विनाकारण बोट दाखवायचे नाही. दुसऱ्याकडे एक बोट दाखवल्यास आपल्याकडे चार बोटे होतात”. महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठस्तरावर सुरू आहे. मी पक्षात शेवटचा घटक म्हणून काम करतो. शेवटच्या घटकाने उच्चस्तरावरील चर्चा न केलेली बरी. तब्येत काहीशी बरी नसल्याने आरामासाठी फोन बंद ठेवला होता. फोन बंद ठेवण्यासाठी मी काही मोठा नेता नाही.’शिवपुत्र संभाजी’ महानाट्य सुरू झाल्यापासून प्रत्येक जण प्रवेशाचीच गोष्ट करतो. काल वाढदिवसाच्या दिवशी देखील तेच! प्रवेशाच्याच गोष्टी सुरू होत्या, असे आमदार लंके यांनी म्हटले.