Political News ः अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ होण्यासाठी धनगर समाजाचे नेते आमदार दत्ता भरणे सरसावले आहेत. यासाठी पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामकरणाचा विषय घेऊन त्यावर कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली आहे. आमदार संग्राम जगताप, आमदार नितीन पवार, सुरेश बनसोडे यावेळी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण व्हावे, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटनांनी लावून धरली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने नामांतरणाच्या मुद्यावर आक्रमक आंदोलन केले आहे. अंबिकानगर हे नाव ‘मनविसे’ने लावून धरले होते. ‘मनविसे’चे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी नगर शहरातील प्रमुख कायनेटिक चौकात अंबिकानगर नामांतराचा फलक देखील झळकवला होता. पुढे नगर जिल्ह्याचे नामांतरण पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगरची मागणी जोर धरू लागली. या मागणीला देखील हिंदूत्ववादी संघटनेने पाठिंबा दिला. भाजप महायुतीचे सरकार आल्यावर चौंडी (ता. जामखेड) येथे नगर जिल्ह्याचे नामांतरणाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर अशी ही घोषणा होती.
भाजप महायुतीशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची नाळ काहीशी जुळली आहे. यानंतर नगरमधील मनविसेच्या नेत्यांनी अंबिकानगर नावावरून काहीशी माघार घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर नामांतराचे स्वागत केले.
राज्य सरकारने महापालिकेला पत्र लिहून नामांतराचा ठराव समंत करून पाठवण्याचे आदेश केला. प्रशासक तथा आयुक्त डाॅ. पंकज जावळे यांनी हा ठराव मंजूर करत, तो जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे पाठवला आहे. हा प्रस्ताव आता पुढे राज्य सरकारकडे सादर होईल. दरम्यान महापालिकेच्या नामांतराच्या ठरावावर वैचारिक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. तसेच एमआयएम आणि समाजवादी पक्ष यासारख्या संघटनांनी या ठरावावर आक्षेप घेतला आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देत नांमातराच्या ठरावाला विरोध दर्शवला आहे.
धनगर समाजाचे नेते तथा आमदार दत्ता भरणे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे धनगर समाज बांधवांनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर नामांतरणासाठी पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन नामांतरणाचा ठराव राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत घेऊन विचार मंजूर करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.