RPI Ramdas Athawale ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. रिपाई उत्तर महाराष्ट्राचे राज्य सचिव राजाभाऊ कापसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पक्षात अनेक वर्षांपासून गटबाजीचे राजकारण सुरु असल्याचा आरोप करुन बेकायदेशीरपणे लादले जात असलेल्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला. जिल्हा संपर्क प्रमुख पदावर विभागीय जिल्हाध्यक्ष भीमाभाऊ बागुल यांची नियुक्ती करून पक्षात गटबाजी करणाऱ्या श्रीकांत भालेराव यांची हकालपट्टी करण्याची मागणी या बैठकीतून करण्यात आली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले पाच मार्चला नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, संगमनेर आणि अकोले येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे यावेळी नियोजन करण्यात आले.
राजाभाऊ कापसे म्हणाले, “रिपाई व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदार आठवले यांच्याशी एकनिष्ठ असलेले जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्यासारख्या पदाधिकाऱ्यांची गरज आहे. राहुरी येथे झालेली बैठक आपल्याला विचारात न घेता, चुकीच्या पध्दतीने जिल्हाध्यक्षाची निवड करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले यांचे आदेश डावलून ही नियुक्ती बेकायदेशीरपणे करण्यात आली”. रिपाईचे दक्षिण जिल्हाध्यक्ष साळवे हेच असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सर्व पदाधिकारी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विभागीय जिल्हाध्यक्ष भीमा बागुल यांनी दक्षिणेतील कार्यकर्त्यांनी केलेल्या भावनांचा विचार करून साळवे हेच जिल्हाध्यक्ष राहणार आहेत. याप्रकरणी मंत्री आठवले यांच्या कानावर गोष्ट घालण्यात आली असून, जिल्हाध्यक्ष साळवेच राहणार असल्याचे त्यांनी सूतोवाच केले असल्याची त्यांनी माहिती दिली.
जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले जो निर्णय घेतील, तो मान्य असेल. परंतु विश्वासात न घेता झालेली नियुक्ती आम्हाला मान्य नाही. पक्षाच्या घटनेनुसार मीच जिल्हाध्यक्ष असून, जिल्हाध्यक्ष पदाची निवड प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या उपस्थित होणे अपेक्षित होती. मात्र बेकायदेशीरपणे निवड करुन तो पदाधिकारी सर्वांवर लादला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे म्हणाले, “जिल्हाध्यक्ष पदाला न्याय देणारा व सर्व कार्यकर्त्यांना बळ देणारा पदाधिकारी अपेक्षित आहे. या पदासाठी साळवे सक्षम असून, त्यांना षडयंत्र करुन हटविण्याचे काम सुरु आहे”. लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रिपाईचे जिल्हा नेते रवींद्र दामोदरे यांनी साध बोलताही न येणाऱ्या माणसाच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची घंटा बांधण्यात आली असून, हे पक्षाच्या दृष्टीने घातक व दुर्देव असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जामखेड तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, शेवगाव तालुकाध्यक्ष सतीश मगर, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, महिला जिल्हाध्यक्ष आरतीताई बडेकर, कर्जतचे सतीश भैलुमे यांनीही आपले मत व्यक्त केले.
विजय भांबळ, लॉरेन्स स्वामी, संजय कांबळे, रवींद्र दामोदरे, बाळासाहेब शिंदे, रवी आरोळे, बाबा राजगुरू, सुरेश भागवत यांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले. या बैठकीसाठी नगरसेवक राहुल कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र दामोदरे, नीलेश बापट, चंद्रकांत ठोंबरे, अमोल सोनवणे, आकाश सोनवणे, शेवगावचे राकेश समुद्र, विकास डाके आदी उपस्थित होते.