अहमदनगर शहराजवळील वडगाव गुप्ता (ता. नगर) इथं 600 एकर जागेवर विस्तारित (एमआयडीसी फेज-2) आणि शिर्डी इथं साईबाबा शिर्डी एमआयडीसी 500 एकर जागेवर उभारण्यास राज्य सरकारने तत्वतः मंजुरी दिली आहे. उद्याेग मंत्री उदय सामंत आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित बैठक झाल्याची माहिती खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी दिली. या दाेन्ही एमआयडीसीसाठी काेणतीही खासगी जागा संपादित केली जाणार नसल्याचेही खासदार विखे पाटील यांनी सांगितले. या दाेन्ही एमआयडीसीमुळे तब्बल 15 हजार युवकांना राेजगार उपलब्ध हाेईल.
अहमदनगर शहरातील विकासाला चालना मिळण्यासाठी, राेजगाराच्या शाेधात स्थलांतर राेखण्यासाठी आणि स्थानिकांना राेजगार उपलब्ध हाेण्यासाठी अहमदनगर शहराजवळ विस्तारित एमआयडीसीची मागणी करण्यात आली हाेती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील हे पाठपुरावा करत हाेते. त्याच अनुषंगाने मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला महसूल, उद्याेग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित हाेते. दाेन्ही एमआयडीसीची जागा निश्चित करण्यात आली आहे. या एमआयडीसीसाठी लागणाऱ्या जमिनीचे हस्तांतरण पुढील दाेन महिन्यात पूर्ण हाेईल. वडगाव गुप्ता इथली जमीन राज्य सरकारची, तर शिर्डी इथली जमीन ही महामंडळाची आहे.
जमिनीचे हस्तांतर आगाऊ हाेणार असल्याने एमआयडीसीचे ले-आऊट व निर्माण कार्य लवकर हाेण्यास मदत हाेणार आहे. याचबराेबर जुन्या एमआयडीसीमधील भूखंडाबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एका वरिष्ठ वकिलाची नेमणूक करण्याची मागणीही मंत्री सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे उद्याेजकांच्या अडचणी साेडवण्यास मदत हाेणार असल्याचे खासदार विखे पाटील यांनी सांगितले.
अहमदनगर शहराजवळील विस्तारित फेज-2 एमआयडीसीसाठी तत्वतः मान्यता दिल्याने येत्या दाेन वर्षात अहमदनगर जिल्ह्यातील किमान 15 हजार तरुणांना राेजगाराच्या नव्या संधी निर्माण हाेतील, असा दावा खासदार विखे पाटील यांनी केला आहे. तसेच सुपा एमआयडीसीसाठी 50 काेटी रुपये खर्चाचे अद्ययावत असे अग्निशमन केंद्र उभारण्यास तसेच सुपा एमआयडीसीमधील अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी 25 काेटी रुपयांचा निधी देण्यासही मान्यता देण्यात आल्याची माहिती खासदार विखे पाटील यांनी दिली.