Manoj Jarange Press ः मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संघर्ष सुरू झालाय. मुंबई येत असल्याचा इशारा देतात अंतरवली सराटी (जि. जालना) येथे मराठा समाजाने जरांगे यांच्याभोवती गर्दी केली. याचवेळी जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आरोप करताच मराठा आंदोलक देखील आक्रमक झाले. एसटी बसला टार्गेट करत ती पेटवण्यात आली. काही ठिकाणी आंदोलक रस्त्यावर उतरले. सरकार देखील आक्रमक मोडमध्ये आले. पोलीस बळाचा वापर करत जरांगे यांच्याबरोबर असलेल्या काही आंदोलकांना ताब्यात घेतले. जालना येथील काही भागात कर्फ्यू लावला. जालनासह आजूबाजूच्या तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा देखील बंद केली. यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारविरोधात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले.
मनोज जरांगे यांनी १७ दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण स्थगित केले. आता उद्यापासून साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू होणार आहे. यासाठी अंतरवालीत रोज चार जण साखळी उपोषण करणार आहेत. १-२ दिवस उपचार घेवून पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले. समाजाच्या भेटीला गावागावात जाणार आहे. समाजाला विचारून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे. आंदोलन शांततेत करण्यावर भर असणार आहे. लोकांना संचारबंदीमुळे येथे येता येत नाही. त्यामुळे मी गावागावात जाणार आहे. तुम्ही गावागावात साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू ठेवा. मी आताही मुंबईला जायला तयार, पण मला मुंबईला जाऊ देत नाही, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री फडणवीसांवर एकेरी भाषेत टीका
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना मनोज जरांगे यांनी त्यांचा एकेरी उल्लेख केला. जरांगे म्हणाले, फडणवीसला रात्रीच काहीतरी घडवून आणायचे होते. फडणवीसला दुसऱ्यांदा अंतरवालीत येथे दंगल घडवायची होती. मी राज्य बेचिराख होण्यापासून वाचवले. जर तिथे रात्री किंवा सकाळी लाठीचार्ज झाला असता, तर राज्यातला सर्व मराठा पेटून उठला असता. पहिला हल्ला देखील फडणवीसनेच केला आहे. अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. त्यानी पोलीस बाजूला सारावेत. सागरचा दरवाजा उघडावा. मी यायला तयार, असेही आव्हान जरांगे यांनी दिले.
सगेसोयाऱ्यापासून सरकारची सुटका नाही
सगेसोयाऱ्यापासून सरकारची सुटका नाही, असा मनोज जरांगे यांनी इशारा देत मुख्यमंत्री शिंदेंना विनंती केली. मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. तातडीने सगेसोयाऱ्याची अंमलबजावणी करा. तुम्ही काल जे केले, ते चागलं केले नाही. तुम्ही काल चक्रव्यूह रचला होता, तो आम्ही तोडला. राज्यात दंगल घडवण्याचे फडणवीसचे स्वप्न होते. ते आम्ही नाही होऊ दिले. पोलिसांनी लोकांवर लाठीचार्ज केला असता, तर राज्य बेचिराख झाले असते. फडणवीस तुम्ही बंगल्यात लपून बसले असता, पण राज्य बेचिराख झाले असते, अशे देखील जरांगे यांनी म्हटले. जनतेला वेठीस धरू नका. डाव प्रति डाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो करू नका. सारखा-सारखा पोलीस बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला, तर लोक देखील तुमचे ऐकणार नाही. मराठा आंदोलकांवर संपूर्ण राज्यातले गुन्हे मागे घ्या. बीडमधील घटनेचे आम्ही समर्थन करत नाही. मात्र खरे लोक पळून गेले आणि खोट्या लोकांवर गुन्हे दाखल केले. हॉटेल जाळणारे त्याचे (मंत्री छगन भुजबळ) यांचे पाहुणे कुठे आहेत, याचा शोध घ्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली.
मंत्री छगन भुजबळांवर टीका
मंत्री छगन भुजबळ यांच्यावर एकेरी भाषेतून टीका करताना, तू काल रॅलीत यायला पाहिजे होते. तुला कळाले असते. कसे धोतर ओले होते. काल १० किलोमीटरपर्यंत मराठे निघाले होते. मुंबईपर्यंत येऊ दिले असते, तर धूर आणि जाळ संगटच होता. तुझ्या येवल्यावरूनच जाणार होतो, कसा धूर आणि जाळ असतो तुला कळाले असते. पण आम्ही कायद्याचा काल सन्मान केला, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
ओबीसीतून आरक्षणावर ठाम
मी दहा टक्क्यातून आरक्षण घेऊ शकत नाही. obc तूनच आरक्षण पाहिजे. या मागणीवर मनोज जरांगे हे ठाम असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. आता सरकारकडे जाणार नाही. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत राहणार आहोत. सरकार आता फक्त १२-१३ दिवस मग जनतेचाच हातात राहिल, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. राजकारण आपल्या डोक्यात नाही आणि करणार पण नाही. तुमचे सर्व सीट पाडले असते. मात्र राजकारण आपल्या डोक्यात नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.