Sharad Pawar News ः बीडमधून मनोज जरांगे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात शरद पवार गट उतरवणार असल्याचा भाजपच्या दाव्यावर शरद पवार यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. आता आमच्यावर अशी वेळ आली आहे का?, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. याचे पडसाद आज विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटले आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी लागली. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे असल्याचा रोख भाजपकडून होत आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून भाजप सत्ताधार्यांकडून आरोपांच्या फैरी सुरू आहेत. यातच भाजप नेते आशिष देशमुख यांनी या आंदोलनाचा संदर्भ लोकसभा २०२४ शी जोडला असून, शरद पवार गटाकडून मनोज जरांगे यांना बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याचा दावा केला आहे.
आशिष देशमुख यांनी हा दावा करताना महाविकास आघाडीच्या बैठकीचा संदर्भ दिला. महाविकास आघाडीची बैठकीत शरद पवार गटाकडून बीडच्या जागेवर दावा करण्यात आला आहे. ही जागा महाविकास आघाडीकडून मागून घेत तिथे मनोज जरांगे यांना उमेदवारी देण्याची तयारी शरद पवार गटाकडून सुरू असल्याचा दावा आशिष देशमुख यांनी केला.
भाजप नेते आशिष देशमुख यांच्या या दावाचा शरद पवार यांनी शेलक्या शब्दात पत्रकार परिषदेत उत्तर दिले आहे. “हा दावा करणारे कोण आहेत?” असा प्रतिप्रश्न शरद पवार यांनी केल्यावर पत्रकारांनी त्यांना देशमुख यांचे नाव सांगितले. हे नाव एेकल्यावर शरद पवार म्हणाले, “हे खूप मर्यादित लोक आहेत. त्यांच्याबद्दल काय बोलायचे!” मनोज जरांगे यांच्या उमेदवारीवर “आता ही वेळ आमच्यावर आली आहे का?” असे प्रश्नार्थीक बोलून शरद पवार यांनी त्यावर अधिक भाष्य करणे टाळले.