केंद्र सरकार महिलांसाठी पाेस्टामार्फत चालविणाऱ्या ‘महिला सन्मान बचत पत्र’ याेजनेला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही लहान बचत याेजना असल्याने केंद्र सरकारने महिला सक्षमीकरण आणि प्राेत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्प २०२३ मध्ये जाहीर केली आहे.
या याेजनेद्वारे महिला किंवा मुलींच्या नावावर दाेन लाख रुपयापर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. या गुंतवणुकीवर ७.५ टक्के व्याजदाराचा परतावा मिळताे आहे. ही याेजना करमुक्त असल्याने महिलांमध्ये लाेकप्रिय झाली आहे.
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यासोबतच महिला सन्मान बचत पत्र मार्च २०२५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात येईल, असे अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्प २०२३ सादर करताना सांगितले हाेते. या याेजनेत मागील तीन ते चार महिन्यात सर्वाधिक पुणे विभागामधून १५ हजार ९१० महिलांनी १६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
तसेच राज्यात इतर विभागांपेक्षा या याेजनेत सर्वाधिक गुंतवणूक पुणे विभागात झाल्याचे दिसून येते. पुणे विभागामध्ये अहमदनगर, सोलापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांचा समावेश होतो. बॅंकांच्या तुलनेत भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये सर्वाधिक व्याजदर या ठेवीस म्हणजेच ७.५% इतके आहे. एक हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येऊ शकते. विशेषतः यामध्ये अंशतः पैसे काढण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- अर्जदाराचे आधार कार्ड
- ओळख पुरावा ( उदा. पॅन कार्ड )
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- ई – मेल आयडी
- फोन नंबर
योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये : –
- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक प्रकारची एक -वेळ बचत योजना आहे.
- केंद्र सरकारच्या अल्पबचत योजनांप्रमाणेच महिलांच्या सक्षमीकरण आणि कल्याणासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू करण्यात आली आहे.
- योजने अंतर्गत अर्जदार एकाच वेळी दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
- योजनेअंतर्गत अर्जदार दोन वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतील.
- या योजनेंतर्गत सरकारने जाहीर केलेला व्याज दर वार्षिक ७.५ टक्के आहे.
- महिला सन्मान बचत पत्र योजनेद्वारे अर्जदार महिलेने जमा केलेल्या रक्कमे वर सरकार करातून सूट देईल.
- या योजनेअंतर्गत १० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलीचे खातेही उघडता येते.
- योजनेच्या माध्यमातून महिलांना योजने मध्ये गुंतवणूक करून करात सूट मिळू शकते.
- देशातील महिलांना या योजनेअंतर्गत बचत करून स्वावलंबी आणि सक्षम बनण्यास मदत होईल.
संकलन ः दीपक बनसाेडे, संशाेधक विद्यार्थी, अहमदनगर