Maharashtra Political ः महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज (ता. २७) यांनी १६ उमेदवारांची यादी जाहीर केली. राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष उद्या (ता. २८) लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. महाविकास आघाडीबरोबर चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊन देखील तोडगा न निघाल्याने वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहेत.
लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन दहा दिवस झाले आहेत. महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीचे संपूर्ण जागावाटप झालेले नाही. वंचित बहुजन आघाडीत वंचितच्या समावेशाचा घोळ कायम आहे. भाजप-शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी अजित पवार गटात जागा वाटपावरून घोळ कायम आहे. जागावाटपानंतर बंडखोरीची सर्वांनाच भीती आहे. त्याचा फायदा प्रतिस्पर्धींना होऊ नये म्हणून आघाडी आणि युतीच्या नेत्यांकडून काळजी घेतली जात आहे.
शरदचंद्र पवार पक्षाची उद्या पहिली यादी जाहीर होणार
राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष राज्यातील नगर दक्षिण, बीड, बारामती, माढा, शिरूर, सातारा, वर्धा, रावेर, भिवंडीसह दहा जागा लढवण्याची तयारी करत आहे. यात पक्षाकडून पहिली उमेदवारांची यादी उद्या (ता. २८) जाहीर करत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. या यादीकडे नगर दक्षिण आणि बीड लोकसभा मतदारसंघात कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविला जाणार आहे, म्हणून विशेष लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी डाॅ. ज्योती मेटे या शरदचंद्र पवार पक्षाकडून बीड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार नीलेश लंके हे शरद पवार यांची साथ करणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या यादीची उत्सुकता शिगेला आहे. तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईत केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची बैठक आयोजित केली जात आहे. या बैठकीत उमेदवारांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची आज पहिली यादी जाहीर
महाविकास आघाडी पक्षातील प्रमुख असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली. महाविकास आघाडीचे जागा वाटप पूर्ण झाल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. वंचितला महाविकास आघाडीकडून पाच किंवा चार जागा सोडण्याची तयारी आहे. यावर वंचित समाधानी न झाल्यास महाविकास आघाडीकडून ठाकरे गट २२, काॅंग्रेस १७ आणि शरद पवार गट नऊ जागा होण्याची शक्यता आहे. यात दक्षिण मुंबईत अरविंद सावंत, मुंबई वायव्य अमोल कीर्तिकर, मंबुई ईशान्य संजय पाटील, ठाणे राजन विचारे, सांगली चंद्रहार पाटील, रत्नागिरी-सिंधुदुर्ग विनायक राऊत, उस्मानाबाद (धाराशीव) ओमराजे निंबाळकर, रायगड अनंत गीते, बुलढाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळ-वाशिम संजय देशमुख, मावळ संजोग वाघेरे-पाटील, हिंगोली नागेश पाटील आष्टीकर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) चंद्रकांत खैरे, शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे, नाशिक राजाभाऊ वाजे, परभणी संजय जाधव यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.