Maharashtra Sahitya Parishad News ः महाराष्ट्र साहित्य परिषद नगर शाखेचा विविध साहित्य प्रकारासाठी ‘राजीव राजळे स्मृती साहित्य पुरस्कार’ जाहीर करण्यात आले. त्यात संकीर्ण विभागात विनोद शिंदे यांच्या ‘नॉट थिंग्ज बट मेन’ या ग्रंथास पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याची घोषणा साहित्य परिषदेचे शाखाध्यक्ष किशोर मरकड व कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. चंद्रकांत जोशी यांनी केली.
महाराष्ट्र राज्यातून एकूण तीनशे लेखकांनी विविध साहित्य प्रकारासाठी आपल्या साहित्यकृती पाठविल्या होत्या. साहित्यप्रेमी राजीव राजळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. संकीर्ण विभागात विनोद जनार्दन शिंदे यांच्या ‘नॉट थिंग्ज बट मेन’ संदर्भग्रंथ म्हणून अनेक नामवंतांच्या प्रशंसेस पात्र ठरली. नगर कॉलेज स्थापणे पूर्वी पासून ते २०२३ पर्यंतचा एकूण १३६ वर्षांचा इतिहास या ग्रंथातून उलगडला जातो.
संस्थापक डॉ. भा. पां. हिवाळे-बार्नबस कुटुंबाचे कॉलेजसाठीचे योगदान याचा परामर्श घेतलेला आहे. कॉलेजची निर्मिती प्रक्रिया ते त्याचे यशोशिखर. या प्रवासात कॉलेजमध्ये ज्या घटना घडल्या, जे उत्तुंग व्यक्तिमत्व, विद्यार्थी घडले विकसित पावले. अनेक राष्ट्रीय योजनांचा येथे पाया घातला. कर्तृत्ववान प्राध्यापकांची फळी निर्माण झाली. अशा अनेक व्यक्तिरेखांचा त्यात मागोवा घेत त्या जिवंत केल्या आहेत. हा ग्रंथ म्हणजे अहमदनगर कॉलेजचा चालताबोलता इतिहास आहे. त्यामुळेच अल्पावधीतच महाराष्ट्रात व विदेशातही कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांत हा ग्रंथ लोकप्रिय ठरला आहे. या ग्रंथाचे महत्व जाणून ‘ प्रोफेसर डॉ. विजय खन्ना ‘ यांच्यावरील लेखास, कॉलेजच्या एका उच्च पदस्थ माजी विद्यार्थ्याने लेखक विनोद शिंदे यांना दहा हजार रुपये भेट म्हणून दिले. ही एक प्रकारे एका रसिक वाचकाने एका उत्कृष्ट साहित्य निर्मितीस दिलेली पोच पावतीच आहे.
कवी विनोद शिंदे यांना यापूर्वीही त्यांच्या ‘शेतें कापणीसाठी पांढरी झाली आहेत’ या कविता संग्रहास शब्दगंधचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी एकूण तीन कविता संग्रह, तीन स्फुट लेखांचे ग्रंथ, एक कथा संग्रह लिहिले आहेत. ज्ञानोदयच्या संपादक डॉ. अनुपमा उजगरे, जेष्ठ गझलकार कवी रमण रणदिवे, मंगल खंडागळे, जेष्ठ कवी नंदकुमार शेंडगे, प्रवीण गायकवाड, जेष्ठ साहित्यिक प्राचार्य हेमंत घोरपडे, अनिल दहीवाडकर, प्राचार्य सुभाष पाटील, प्रो. डॉ. सुधाकर शेलार, फिलीप अब्राहम, अशोक गायकवाड, अशोक मोरे, प्रवीण लोंढे, विश्वास शिंदे यांनी विनोद शिंदे यांचे कौतुक केले आहे.