राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेला तुडुंब गर्दी हाेती. त्यामुळे सभेत जाेश हाेता. या जोशपूर्ण सभेत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा येईलचा संदर्भ घेत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यावर खाेचक, तर देवेंद्र फडणवीस यांना डिवचले आहे.
“मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले हाेते की, मी पुन्हा येईल. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी 15 ऑगस्टच्या भाषणात मी पुन्हा येईल असाच सूर लावला हाेता. देवेंद्र पुन्हा आहे, पण ते खालच्या पदावर आले. पंतप्रधान यांना आज जे पद आहे, त्याच्या खालच्या पदावर कुठे जायचे आहे का? पंतप्रधानांना जी पाऊले टाकायची आहेत, ती त्यांनी जपून टाकावी”, अशी टीका शरद पवार यांनी केली.
शरद पवार यांच्या या खाेचक टीकेवर भाजप काय उत्तर देईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांनी या टीकेतून नरेंद्र माेदींबराेबर देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. अजित पवार सत्तेत सहभागी हाेण्यापूर्वी देखील शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे वाकयुद्ध सुरूच हाेते. आता शरद पवार यांनी मैदानात उतरून सत्ताधाऱ्यांविराेधात थेट दंडच थोपटले आहेत.
शरद पवार म्हणाले, “देशाची सत्ता चमत्कारीत लाेकांच्या हाती आहे. जात, धर्म आणि भाषेवरून वाद लावले समाजात अंतर पाडले जात आहे. महागाईचा प्रश्न, शेती, बेराेजगारी, अर्थसंकटावर काम करायला हे सरकार तयार नाही. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे आणि निराशाचे वातावरण आहे”. कायदा-सुव्यवस्थेबाबत तीन-तेरा झाले आहेत. मणिपूर, नागालॅंड, हरिणाया, सिक्किम, अरुणाचलमधील काय परिस्थिती आहे, सर्वश्रूत आहे. या राज्यांच्या शेजारी पाकिस्तान आणि चीन आहे. या दाेन्ही देशांची नजर हिंदुस्थानाकडे चांगली नाही. कधी काय हाेईल, हे सांगता येत आहे. याबाबत सतर्क राहिल पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले.
“केंद्रावर विश्वास ठेवून चालणार नाही. लाेकशाहीमध्ये लाेकांनी निवडून दिलेली सरकारे पाडण्याचा उद्याेग केंद्राकडून केला जात आहे. गाेवा, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेशमधील स्थिर सरकार केंद्राने उद्ध्वस्त केली. एकप्रकारे स्थिर सरकार पाडून तुम्ही सामान्य माणसांचे जीवन उद्धवस्त केले. ही सर्व आव्हाने आहेत. ज्यांना आपण सत्ता दिली ती याेग्यपद्धतीने वागत नाही”, अशीही टीका शरद पवार यांनी केली. वेळ आलेली आहे. सत्तेचा गैरवापर कुणी वेगळं राजकारण करत असेल, ठिक आहे तुम्ही राजकारण करत आहात, पण असं राजकारण करणाऱ्यांना उलथून टाकायला वेळ लागणार नाही. त्यासाठी प्रयत्ने केला पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.