नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांच्याभाेवती बरच काही झाले आणि ते प्रचंड चर्चेत हाेते. यानंतर सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले. डाॅ. सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव करून सत्यजित तांबे हे निवडणूक जिंकले. अजूनही आमदार सत्यजित तांबे आणि काॅंग्रेसमधील वाद कायम आहे. सत्यजित तांबे यांनी यावर माेठे भाष्य केले आहे.
सत्यजित तांबे म्हणाले, “काही ठराविक लाेकांनी टार्गेट करून मला बाहेर ढकलले. तरी माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या रक्तात आणि विचारांत काॅंग्रेस आहे. 2030 मध्ये काॅंग्रेसमध्ये माझ्या परिवाराला 100 वर्षे पूर्ण हाेतील”. परंतु काही लाेकांनी बाहेर ढकलून दिले असेल, तर ही पक्षश्रेष्ठींची जबाबदारी आहे की, मला त्यांनी बाेलावले पाहिजे. परंतु, अशा काेणत्याही हालचाली अद्याप नाहीत, असे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कोणत्या लोकांनी टार्गेट केले, याबाबत सत्यजित तांबे यांचा कोणावर रोख आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
“माझे काँग्रेसच्या वरिष्ठांशी मतभेद झालेले नाहीत. तसेच, कोणाशी मतभेद असण्याचं कारणही नाही. निवडणुकीच्या काळात घडलेल्या घटनांबद्दल अनेक माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. तेव्हा काही ठराविक लोकांनी गैरसमज निर्माण केले. त्यातून पक्षाने माझ्यावर कारवाई केली”, असेही सत्यजित तांबे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.
याशिवाय पक्ष निरीक्षक माजी मंत्री चंद्रकांत हंडाेरे हे नुकताच शिर्डी दौऱ्यावर आले हाेते. लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी आढावा घेतला. यावेळी डाॅ. सुधीर तांबे यांची उणिव असल्याचे कार्यकर्त्यांनी बाेलावून दाखवले. त्यावर चंद्राकांत हंडाेरे यांनी डाॅ. सुधीर तांबे यांना सन्मानाने पक्षात पुन्हा बाेलावले जाईल, असे सांगितले हाेते. यातच आता आमदार सत्यजित तांबे यांची काॅंग्रेस पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे तांबे पिता-पुत्रांचा काॅंग्रेसमधील प्रवेश निश्चित असल्याचे दिसते आहे.