तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिनचे सुपुत्र उदयनिधी स्टालिन यांनी हिंदू धर्माबद्दल केलेल्या वक्तव्यावर टीका करताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जाेरदार टीका केली. मंत्री विखे पाटील यांच्या या टीकेवर अहमदनगरमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी बाेचरे प्रत्युत्तर दिले आहे.
गिरीश जाधव यांनी थेट दहशतवाद्यांना मास्टर माईंड झाकीर नाईक याचा दाखल देत मंत्री विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. गिरीश जाधव यांनी म्हटले आहे की, “दहशतवाद्यांचा मास्टर माईंड झाकीर नाईक याच्याकडून काेट्यवधी रुपयांची मदत आपल्या शिक्षणसंस्थांसाठी घेतली. त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे खुलासा आणि त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही”. मंत्री विखे पाटील यांची टीका म्हणजे ‘वड्याचे तेल वांग्यावर काढणे’, अशी आहे, असेही गिरीश जाधव यांनी म्हटले आहे.
गिरीश जाधव यांनी पुढे म्हटले आहे की, “सत्तेसाठी प्रत्येक निवडणुकीत नव्या पक्षाची माळ घालून आपली खुर्ची आणि पद शाबूद ठेवण्याचा प्रयत्न विखे पाटील करतात. काॅंग्रेस, शिवसेना आणि आता भाजपमध्ये आहेत. जिथे सत्ता तिथे विखे हे, तर त्यांचे सूत्र! शिवसेनेत विखे पाटील पिता-पुत्र मंत्री होते. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा घेऊन त्यावेळेस विखेंची उचलबांगडी केली. हा इतिहास जनता विसरू शकत नाही. आणि आता त्यांनीच हिंदुत्व आम्हाला शिकवावे?” उदयनिधी स्टॉलिन याने जे वक्तव्य केले, त्यावर खडे फोडायचे सोडून आमच्या नेतृत्ववाबद्दल शंका घेण्याचा अधिकार आपण कधीच गमावलेला आहे. काँग्रेस पक्षात असताना आपण भाजपच्या हिंदुत्ववाद, कसा बेगडी आहे, हे सांगणारी हजारो वक्तव्ये आमच्याकडे आहेत, असेही गिरीश जाधव यांनी म्हटले आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले हाेते
तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन सुपुत्र उदयनिधी यांच्या हिंदू धर्माबद्दलच्या बेताल वक्तव्यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निषेध पत्रक काढले आहे. यात मंत्री विखे पाटील यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले आहे. उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माबद्दल जे वक्तव्य केले, त्याचा समाचार घेताना मंत्री विखे पाटील यांनी स्टालिन यांना मेंदूज्वर झाल्याचे हे लक्षण असल्याचे म्हटले. जिहादी प्रवृत्तीच्या या वक्तव्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचे सांगत महाराष्ट्रातील इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून याचा खुलासा करावा, अशी मागणी मंत्री विखे पाटील यांनी केली आहे. मंत्री विखे पाटील हे यावरच थांबले नाही, तर या वादात माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली. उदयनिधीचे वडील ज्या आघाडीत सहभागी झाले आहेत. त्या आघाडीचे नेतृत्व करायला उद्धव ठाकरे निघाले आहेत. स्टालिन यांच्या वक्तव्याच्या मान्यतेचा खुलासा मंत्री विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना मागितला आहे.