शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. राष्ट्रवादीमधील फूटीने राज्यातील राजकारण ढवळून निघत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर अजित पवार दिसतील, असे राष्ट्रवादीतून फुटलेला अजित पवार गटाचे कार्यकर्ते म्हणत आहे. शरद पवार आणि अजित पवार गटात सध्या शाब्दिक द्वंद सुरू आहे. यातच स्वराज्य संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भविष्यवाणी केली आहे.
संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, “एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाणार आणि अजित पवार हे मुख्यमंत्री हाेणार असे बाेलले जात आहे. मात्र अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदावर संधी मिळणार नाही. परंतु अजित पवार यांच्याबराेबर असलेले आणि सध्या भाजपसाेबत जाऊन मंत्री बनलेले नऊ मंत्री शरद पवार यांच्याकडे पुन्हा जातील”.
मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच राहतील. अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाणार नाही. हे केवळ लाेकसभा निवडणुकांसाठी जुळविलेले गणित आहे. तिन्ही पक्ष विधानसभा निवडणुका एकत्रित लढणार तरी कसे, असा प्रश्न छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी उपस्थित केला.
छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिक्रियेनंतर आता काॅंग्रेस नेते विराेधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदावर बाेलले आहेत. ‘बारामतीच्या सभेत अजित पवार म्हणाले, मी त्यावेळी मुख्यमंत्री झाला असताे, असे म्हणाले हाेते. याचा अर्थ मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी अजित पवार गेले हे समजू शकताे. मात्र अजित पवार हे ईडीच्या भीतीमुळे गेले आहेत. आणि हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतीलच’, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.