राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात नेमके काय चालू आहे, हेच कळायला मार्ग नाही. शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानाचे समर्थन करत अजित पवार हे आमचेच आहे, असे वक्तव्य केले आहे. पक्षातील काहींनी वेगळी भूमिका घेतली, म्हणजे पक्षात फूट पडली असे म्हणता येत नाही, असे शरद पवार यांचे विधान संभ्रमात टाकणारे आहे. शरद पवार यांच्या या गुगलीमुळे राज्याच्या राजकारणात तर्कविर्तकांना विधान आले आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बाेलत हाेते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरूवारी राष्ट्रवादीत काेणतेही फूट पडली नसून, अजित पवार हे आमचेच नेते आहेत, अशी भूमिका मांडली हाेती. यावर शरद पवार यांनी सुप्रिय सुळे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले.
शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विधानाचे समर्थन करत म्हणाले, “ते आमचेच आहेत. त्यात काही शंका नाही आणि वादही नाही. फूट पडली याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी येते, जेव्हा पक्षातच देशपातळीवर एक मोठा वर्ग वेगळा झाला तर, परंतु अशी स्थिती इकडे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला, काहींनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. जो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट म्हणायचे काही कारण नाही, तो त्यांचा निर्णय आहे”.
बीडमध्ये अजित पवार यांची उत्तर सभा हाेत आहे. यावर देखील शरद पवार यांनी भाष्य केले. बीडमधील माझ्या सभेनंतर जर काेणी तिथे आपली भूमिका मांडत असेल, तर त्याचे लाेकशाहीमध्ये स्वागत आहे. तसे ते स्वागत व्हायला हवे. काेणी वेगळी भूमिका घेते, आणि ती लाेकांमध्ये जाऊन मांडत असे, तर त्याचे स्वागत आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.