‘शरद पवार बराेबर आले, तरच मुख्यमंत्री करू, अशी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी अजित पवार यांना ऑफर दिली आहे’, असा खळबळजनक दावा विराेधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकारण तापू लागले आहे. ठाकरे गटाचे संजय राऊत, काॅंग्रेस नेते अशाेक चव्हाण आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर आपआपली प्रतिक्रिया देऊन राज्याच्या राजकारणात अधिकच धुरळा उडवून दिला आहे.
‘राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला शरद पवार यांच्या येण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काेणतीच अट घातलेली नाही. विराेधक माध्यमांना देत असलेली माहिती संकुचित वृत्तीची आहे. त्यावर विश्वास ठेवू नये. केवळ महाराष्ट्राला गतीमान आणि देशाला कणखर नेतृत्व देण्यासाठी आम्ही भाजपबराेबर गेलाे आहाेत’, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली. अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांच्या या दाव्यावर जाेरदार टीका केली आहे. ‘आमच्या या निर्णयामुळे काहींना दुःख झाले आहे. त्यामुळे ते अशी विधान करून संभ्रम तयार करत आहेत’, असे ते म्हणाले.
‘राजकीय परिस्थिती बाजूला ठेवा. सर्वसामान्यांमध्ये देखील शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवरून संभ्रम आहे. यासंबंधी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी भूमिका स्पष्ट करायला हवी. यानंतरच महाविकास आघाडीला एकत्रित कामाला सुरूवात करता येणार आहे. उद्धव ठाकरे आणि नाना पटाेले यांच्या एकांतातील भेटीबाबत माहिती नाही. तसेच काॅंग्रेस आणि ठाकरे गटाचा काेणता एबीसी प्लॅन तयार झाला आहे की माहिती नाही’, अशी स्पष्ट भूमिका काॅंग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण यांनी मांडली.
“शरद पवार यांना ऑफर देऊ शकतील, एवढे माेठे अजित पवार झालेले नाहीत. अजित पवार यांना शरद पवार यांना घडविले आहे. अजित पवार यांनी शरद पवारांना नाही”, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. महाविकास आघाडी एकत्र आहे. आगामी निवडणुकीला देखील आम्ही एकत्रित सामाेरे जाणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.