पृथ्वीवरील स्वर्गीय आवाज असलेल्या लतादीदी या सरस्वतीचाच अवतार होत्या. लतादीदीचा आवाज व गाणे ऐकून अनेक नागरिक आजारातून किंवा दु:खातून बाहेर पडलेले आम्ही पाहिले आहेत. अशा या दीदीला जेव्हा ९१ व्या वर्षी निमोनिया व नंतर ९३ व्या वर्षी काेरोना झाला, त्यावेळी तिच्या सहनशक्तीची कमाल आम्ही बघितली. वसंत पंचमी या सरस्वती पूजनानंतर होणाऱ्या सरस्वती विसर्जनाच्याच दिवशी दीदीने देह ठेवला. हा मोठा चमत्कार म्हणावा लागेल. याचा अर्थ लतादीदी सरस्वतीचाच अवतार होती. जसा सरस्वतीचा वास सर्वत्र असतो, तसा आमच्या घरात अचानक कधीतरी मोगऱ्यांच्या फुलांचा सुगंध येतो. त्यामुळे दीदीचे अस्तित्व अजूनही आमच्या घरात आहे. त्यामुळे आम्ही अजूनही मानतो की दीदी गेलेली नाही. आजही ती जनमानसांच्या मनात जिवंत आहेच, असं भावुक प्रतिपादन ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी केले.
अहमदनगर शहराच्या ५३३ व्या स्थापनादिनाचे औचित्य साधून अहमदनगरच्या रसिकांना अनोखी संगीतमय मेजवानी देण्यासाठी अहमदनगरचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.सुहास मुळे यांनी निर्मित व दिग्दर्शित केलेल्या ‘मन चाहे गीत’ या म्युझिकल स्टार नाईट कार्यक्रमात प्रख्यात जेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे, आमदार संग्राम जगताप उपस्थित होते. यशवंतराव सहकार सभागृहात झालेल्या या दिमाखदार कार्यक्रमात सुहास मुळे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत उषा मंगेशकर यांनी लता दीदींचा व पूर्ण मंगेशकर कुटुंबियांचा जीवनपट उलगडला. या कार्यक्रामात अहमदनगर मधील १४ उदयोन्मुख गायकांनी लतादीदींची व इतर गायकांची अजरामर झालेली गाणी सादर केली.
सामाजिक कार्यकर्ते सुहास मुळे यांनी अतिशय कुशलतेनं घेतलेल्या मुलाखतीमध्ये ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर खूप हळव्या झाल्या, त्यांचा कंठही दाटून आला. त्या म्हणाल्या, “आम्ही चौघेजण भावंडे, मात्र सर्वांचा आवाज वेगळा आहे. लतादीदी सारखा आवाज, गायकी, ठेवण आमच्यात नाही. अत्यंत दयाळू, दानशूर, प्रेमळ व लहान मुलांवर व मुक्या प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या लतादीदीने स्वतःसाठी कधीही खर्च न करता कोणालाही न सांगता देशासाठी व गरजूंना अनेकदा मोठमोठी मदत केली”. छत्रपती शिवाजी महाराज दीदीचे दैवत होते. ती स्वतःला ‘शिवदासी’ म्हणून घेत असे. दीदीची व स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अनेकदा भेट झाली. त्याकाळात सावरकरांबरोबर दलितांच्या पंगतीत बसून लतादीदीने जेवण केले होते. वयाच्या १३ व्या वर्षापासून सुरु केलेली गायनसेवा ८० वर्ष जपत वयाच्या ९३ वर्षापर्यंत दीदीने जोपासली. दीदी व तिचा आवाज दैवी चमत्कारच होता, असेही उषा मंगेशकर म्हणाल्या.
नव्या गायकांना सल्ला देतांना उषा मंगेशकर म्हणाल्या, “नवे गायक ताला सुरात गातील पण त्यात काहीतरी कमी असतेच ती म्हणजे गाण्यातील भावना. लतादीदीने प्रत्येक गाण्यातील भाव जाणून घेत गायले. म्हणून दीदीचे प्रत्येक गाणे परिणामकारक झाले. त्यामुळे दीदींची गाणी बारकाईने ऐकून त्यातील भाव ओळखून त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करा”. नव्या गायकांसाठी एक म्युझिकल अकॅडमी सुरु करायची व कलाकारांच्या घरातील वृद्धांसाठी एक वृद्धाश्रम सुरु करण्याची इच्छा लतादीदीची होती ती आम्ही पूर्ण करत आहोत. या कार्यक्रमात ज्या गायकांनी सहभाग घेतला त्यांना या अकॅडमीमध्ये संधी देवू, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांनीही मार्गदर्शन केले. अहमदनगरच्या कलाकारांमध्ये खूप हुनर आहे. त्यांनी सादर उत्कृष्ट गाणे सादर केली. लतादीदींची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पण त्या गाण्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. सुहास मुळे यांनी मला वर्षांनंतर पुन्हा अहमदनगरला बोलावून माझा मानसन्मान केल्याबद्दल फार फार आभारी आहे.
आराधना गायकवाड, एस्तर पवार, स्नेहल नायडू, किरण खरे, रेणुका पवार, संजय माळवदे, राजू सावंत, चारू ससाणे, प्रशांत छजलानी, सुनील हळगावकर, सुनील भंडारी, डॉ.शैलेश खंडागळे, राजू क्षेत्रे व दिनेश मंजतकर आदींनी लतादीदींची प्रसिद्ध गाणे सदर केली. सर्व सहभागी कलाकार व अमीन धारणी, आबिद खान, ज्येष्ठ मेंडोलिन वादक डेव्हिड चांदेकर व राजू ढोरे यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

प्रारंभी उषा मंगेशकर व पुष्पा पागधरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाचे उद्गाघाटन करण्यात आले. यावेळी आकाशवाणी पुढे केंद्र येथे अधिकारी असलेल्या अर्चना बारसोडे यांनी गणेशवंदना सादर केली. चारुता शिवकुमार यांनी सूत्रसंचालन केले. अमेय मुळे यांनी आभार मानले.