Ahmednagar News : “आपल्याकडे अनेक महान राष्ट्रपुरुष झाले आहेत. त्यांचे कार्य व पराक्रम आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मात्र या राष्ट्रपुरुषांचा वापर केवळ जात, पुतळे व राजकारणासाठीच होत असल्याने खंत वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य किती महान आहे हे सांगण्याची गरज नाहीये. मात्र अद्याप महाराज आपल्याला समजलेच नाहीयेत. यासाठी सर्वप्रथम त्यांचे विचार आत्मसात करा. रांगोळीची परंपरा ही श्रीरामाच्या काळापासून चालत आली आहे. ही परंपरा जपत महाराजांच्या जीवनावर अतिशय बोलक्या रांगोळ्या कलारंगच्या कलाकारांनी रेखाटल्या आहेत. सुजाता पायमोडे यांनी या कलेला आधुनिक रूप दिले आहे. ही कला अजून बहरत जावो”, अशा शुभेच्छा पद्मश्री पोपटराव पवार यांनी दिल्या.
कलारंग अकॅडमी, चौपाटी मित्र मंडळ आणि श्री समर्थ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून चितळे रोडवरील ऋग्वेद भवन येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचित्र रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी कलारंग अकॅडमीच्या संचालिका सुजाता पायमोडे, समर्थ मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाश कुलकर्णी, चौपाटी कारंजा मित्रमंडळाचे अध्यक्ष अमोल भंडारे, महेंद्र तापकिरे, महेश कुलकर्णी, निनाद ढोरे आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. हे प्रदर्शन २ मे पर्यंत सर्वांसाठी खुले राहणर आहे.
कलारंग अकॅडमीच्या २९ विद्यार्थ्यांनी चार दिवस अहोरात्र मेहनत घेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रमुख प्रसंगांवर भव्य रांगोळ्या रेखाटल्या आहेत. या रांगोळ्यांमधील व्यक्तिचित्रे इतकी जिवंत व हुबेहूब रेखाटली आहेत की त्या व्यक्ती आपल्यापुढे प्रत्यक्षात उभ्या आहेत. या प्रदर्शनात महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत ६ ते १० फुटांच्या एकूण १५ रांगोळ्या राखण्यात आलेय आहेत. आकर्षक सुयोग्य रंगसंगती व बॅकग्राऊंड मुळे या रांगोळ्यांची भव्यता अधिक वाढत आहे.
प्रास्ताविकात सुजाता पायमोडे म्हणाल्या, चौपाटी कारंजा मित्र मंडळाच्या सहकार्याने हे प्रदर्शन यशस्वी होवू शकले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट रेखाटण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याचा व इतिहासाचा अभ्यास केला आहे. रांगोळीने व्यक्तिचित्र रेखाटाना खूप सूक्ष्म नियोजन असते. याप्रकारच्या रांगोळीत एका सेंटीमीटरमध्ये १५ ते २० शेड्स असतात. त्यामुळे अतिशय अवघड हा प्रकार आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी केवळ तीन दिवसांच्या प्रशिक्षणातून ही अवघड कला आत्मसात केली आहे. खूप मेहनतीने व जिद्दीने या रांगोळ्या रेखाटण्यात आल्या आहेत. यासाठी सुमारे ६० किलो रांगोळी व रंग लागले आहेत.
शिवचित्रकथा या रांगोळी प्रदर्शनात कलारंग अकॅडमीच्या संदेश बोडखे, मानस कुरापाटी, मानसी राठी, प्रथमेश झावरे, प्रचिती कुलकर्णी, सौम्या जाधव, जान्हवी डोंगरे, तनुश्री भळगट, आर्या निंबाळकर, स्नेहांकिता सरोदे, अर्चना ताटी, स्वरा कोळपकर, दुर्गा कानवडे, साक्षी देशमुख, शर्वरी वंगा, पल्लवी चव्हाण, अपूर्वा नांदुरकर, सृष्टी चिंतामणी, वेदांगी पाटील, शताक्षी लोणकर, समृद्धी बडे, पलक खंडेलवाल, आरती कटारिया, सेजल कटारिया, सिद्धी झोडगे व ईशा सादुल आदींनी सहभाग घेत रांगोळ्या रेखाटल्या आहेत. सहभागी मुलींनी नववारी साडी व फेटा तसेच मुलांनी कुडता व फेटा केलेला मराठमोळा पेहराव व शिवाजी महाराजांच्या गाण्यांचे पार्श्वसंगीता मुळे येथील वातावरण शिवमय झाले होते. भाग्यश्री जोशी यांनी सूत्रसंचालन केले, आभार महेंद्र तापकीरे यांनी मानले.