Ahmednagar Police ः कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावेत. यासाठी सासरच्या लोकांकडून विवाहित तरुणीचा शारिरीक आणि मानसिक छळ करण्यात आला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सासरच्या आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जयश्री विजय आव्हाड (रा. उंदीरगाव, ता. श्रीरामपूर, हल्ली रा. धामोरी बुद्रुक, ता. राहुरी) या विवाहित युवतीने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
लग्न झाल्यानंतर सुमारे तीन महिने सासरच्या लोकांनी जयश्री हिला चांगल्या प्रकारे नांदवले. त्यानंतर धामोरी येथे जायचे नाही. तेथील काम सोडून दे. जादूटोणा करतेस. माहेरी जाऊ नको, असे म्हणून तिला शिवीगाळ करुन किरकोळ कारणावरून सासरचे लोकांनी मारहाण सुरू केली. शेतात कुक्कुटपालन करायचे आहे. यासाठी जयश्री हिने माहेरहून दोन लाख रुपये आणावेत.
तसेच जयश्री हिचा पती विजय हा रात्री उशिरापर्यंत अनोळखी मुलीसोबत फोनवर बोलत असे. याचा जाब विचारला म्हणून सासरचे लोक जयश्री हिला लाथाबुक्क्यांनी मारहान करुन शिवीगाळ करत असे. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून जयश्री विजय आव्हाड या विवाहित तरुणीने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पती विजय रखमा आव्हाड, हिराबाई रखमा आव्हाड, रखमा बन्सी अव्हाड ,सुनिता रखमा आव्हाड (सर्व रा. उंदीरगाव, ता. श्रीरामपूर), संगीता अनिल सोळसे, अनिल साहेबराव सोळसे (रा. दहेगाव, ता. राहाता), अनिता चंद्रकांत वाकचौरे, चंद्रकांत भाऊ वाकचौरे (दोघे रा. मुलनमाथा, राहुरी) या आठ जणांविरुद्ध शारिरीक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.