Maratha Reservation ः मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करणारे नगरमधील कीर्तनकार अजय बारस्कर महाराज यांच्या कुटुंबियांना पाच जणांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी नगरमधील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
किरण बारस्कर यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल शिवाजी घोलप (रा. घोलपवस्ती, निबंळक, ता. नगर), स्वप्नील चव्हाण, करण मापारी, अक्षय शेवाळ आणि सुरज शेवाळ (रा. नगर) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण बारस्कर हे एमआयडीसीमधील जिमखाना परिसरात असताना त्यांच्याकडे पाच जण आले. कीर्तनकार अजय बारस्कर हे नगरमध्ये आल्यावर त्यांना जीवे ठार मारू, अशी धमकी दिल्याचे किरण बारस्कर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
कीर्तनकार अजय बारस्कर महाराज यांनी केल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर संशय घेऊन पत्रकार परिषद घेत आरोपांच्या फौरी झाडल्या. अनेक मुद्दे उपस्थित करून मनोज जरांगे हे मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचे देखील अजय बारस्कर यांनी म्हटले. अजय बारस्कर यांच्या या आरोपानंतर मराठा समाजात संतापाची लाट उसळली. अजय बारस्कर हे सध्या मुंबई येथे वास्तव्यास आहे. त्यांच्यावर काहींनी हल्ले देखील केले आहेत. तसेच त्यांना फोनवर धमक्या देखील देण्यात येत आहेत. यातच आता नगरमधील त्यांच्या नातेवाईकांना देखील धमक्या देण्यात येत आहेत. अशा परिस्थिती देखील अजय बारस्कर हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी तुकाराम महाराज यांचा अपमान केलाय. तो मी कधीच सहन करणार नाही, असे सांगून अजय बारस्कर हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांच्या आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशीची घोषणा करण्यात आली आहे. आता मराठा समाज आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी जिल्हानिहाय बैठका होत आहेत. नगरमध्ये देखील आज दुपारी बैठक होत आहे.