‘72 हूरें’ चित्रपटाची देशभर चर्चा सुरू आहे. या चित्रपटावरून देखील वाद सुरू झाले आहेत. टीझर रिलीज झाल्यापासून वादाला सुरूवात झाली आहे. सेन्सॉर बोर्डाने ट्रेलरला नकार दिल्यानंतर निर्मात्यांनी ट्रेलर डिजिटली प्रदर्शित केला. चित्रपटावरून हा वाद सुरु असतानाच दुसरीकडे, मुंबईतील गोरेगाव पोलिस ठाण्यात ‘72 हूरें’चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकाविरोधात तक्रार दाखल झाली आहे.
‘72 हूरें’चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक संजय पूरण सिंह चौहान यांनी केले आहे. या चित्रपटाटी निर्मिती अशोक पंडित, गुलाबसिंग तन्वर, अनिरुद्ध तन्वर आणि किरण डागर यांनी केली आहे. चित्रपटात पवन मल्होत्रा, आमिर बशिर, राशिद नाज, अशोक पाठक हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 7 जुलै 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे ट्रेलरमधून जाहीर करण्यात आले आहे.
मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते सय्यद अरिफअली महमोदअली यांनी या चित्रपटाबाबत तक्रार केली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शकासह चार निर्मात्यांनी मुस्लिम धर्माचा अपमान केला आहे. तसेच भेदभाव, द्वेष निर्माण करणे तसेच विशिष्ट समुदाय आणि मुस्लिम समाजाची चुकीची प्रतिमा दाखवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चुकीच्या प्रचाराद्वारे पैसे कमावल्याचा आरोपही चित्रपटाच्या निर्मात्यांवर या तक्रारीद्वारे करण्यात आला आहे.
या चित्रपटात आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू झालेल्या दोन दहशतवाद्यांची कथा दाखविण्यात आली आहे. दहशतवाद्यांना प्रशिक्षणादरम्यान ‘तुमच्या मृत्यूनंतर जन्नतमध्ये 72 कुमारिका मुली तुमच्या सेवेत राहतील’ असे आश्वासन देऊन त्यांचा ब्रेनवॉश केला जातो, असे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाने पास करण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र, असे असतानाही चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘72 हूरें’ चा ट्रेलर डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित केला. यानंतर वादाला सुरुवात झाली. यापूर्वी मौलाना साजिद रशीद यांनीही या चित्रपटावर आक्षेप नोंदवला आहे.