यंदा भारतात जगप्रसिद्ध मिस वर्ल्ड स्पर्धा हाेणार आहे. भारताला यंदाचे स्पर्धेसाठी यजमानपद भूषवण्याचा बहुमान मिळणार आहे. यानिमित्ताने तब्बल 27 वर्षांनी भारतात पुन्हा एकदा मिस वर्ल्ड स्पर्धा हाेणार आहे. यापूर्वी भारतात 1996 राेजी भारतात मिस वर्ल्ड स्पर्धा झाली हाेती. यंदा ही स्पर्धा नाेव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये हाेण्याची शक्यता आहे.
मिस वर्ल्डच्या 71 व्या स्पर्धेचे आयाेजन भारतात हाेईल, अशी घाेषणा मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ज्युलिया मोर्ले यांनी पत्रकार परिषदेत केली.
ज्युलिया मोर्ले म्हणाल्या, “ मिस वर्ल्डच्या 71 व्या स्पर्धेसाठी भारताची निवड करताना मला अत्यंत आनंद होत आहे. येथील वैविध्यपूर्ण संस्कृती, जागतिक वारसा स्थळे याची माहिती जगभरात पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
‘या स्पर्धेनिमित्ताने आम्ही एक महिना भारतातील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देणार आहाेत. जवळपास एक महिना सुरू राहणाऱ्या या कार्यक्रमात 130 हून अधिक देशातील स्पर्धक सहभागी हाेणार आहेत’, असे ज्युलिया माेर्ले यांनी सांगितले. सध्याची मिस वर्ल्ड कॅराेलिना बिलाव्स्का ही देखील पत्रकार परिषदेला उपस्थित हाेती.
दरम्यान, भारताने ‘मिस वर्ल्ड’चा खिताब तब्बल सहा वेळा जिंकला असून आतापर्यंत रिटा फारिया (1966), ऐश्वर्या राय (1994), डायना हेडन (1997), युक्ता मुखी (1999), प्रियांका चोप्रा (2000) आणि मानुषी छिल्लर (2017) या सौंदर्यवतींनी ‘मिस वर्ल्ड’ होण्याचा बहुमान मिळवला आहे.