भारत-बांगलादेश यांना जोडणाऱ्या दुसऱ्या सद्भावना सायकल यात्रेस अहमदनगरमधून प्रारंभ होत आहे. रविवारी, 10 सप्टेंबरला सायंकाळी 7:30 वाजता अहमदनगर रेल्वे स्थानकावर यात्रेला पद्मश्री पोपटराव पवार,रोटरी आणि लायन्स क्लबचे पदाधिकारी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यावेळी सर्व सायकल यात्री सद्भावना गीते आणि पथनाट्य यांचे सादरीकरण करणार असल्याची माहिती यात्रेचे प्रमुख मार्गदर्शक नितीन थाडे, स्नेहालयाचे राजीव गुजर,संजय गुगळे, सीमा जुंनी,पूजा भांडारे, हनीफ शेख , ॲड.श्याम असावा, प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित, मेहरनाथ कलचुरी यांनी दिली.
यंदाच्या सायकल यात्रेत शंभर सामाजिक संस्था आणि बदल घडवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी सायकल यात्री घेणार आहेत. रस्त्यात समता आणि सद्भावनेची गाणी ,पथनाट्य, सर्वधर्म प्रार्थना , असे उपक्रम राबविले जाणार आहेत.विशेषतः सामाजिक तणाव असलेल्या ठिकाणी सामाजिक सद्भावनेचे आणि संवादाचे उपक्रम आखण्यात आले आहेत.
पहिली यात्रावर्ष
2021 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने अहमदनगर ते बांगलादेश, अशी 4 हजार 281 किलोमीटरची सायकल यात्रा स्नेहालय संस्थेने काढली होती. त्यात भारतभरातून आणि प्रामुख्याने अहमदनगरमधून 150 युवा सहभागी झाले होते. यात सहभागी युवा कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थ्यांना देशातील 500 नामांकित समाजसेवक आणि सामाजिक विकास करणाऱ्या संस्थांना भेट देण्याची संधी मिळाली. स्नेहालय संस्थेने बांगलादेश येथील गांधी आश्रम ट्रस्ट या संस्थेसोबत कार्य करार केला. त्यानुसार वर्ष 2022 मध्ये स्नेहालय संस्थेत झालेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात बांगलादेश येथून अनेक सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्नेहालयकडून प्रेरणा घेऊन आंतरराष्ट्रीय युवा शिबिर आणि भारत बांगलादेश सायकल यात्रा यांचे आयोजन गांधी आश्रमाने केले आहे. यंदाच्या भारत-बांगलादेश सायकल यात्रेत एकूण 130 जणांनी सहभाग घेतला आहे. त्यापैकी 60 जण सायकलवर येणार आहेत. उर्वरित ज्येष्ठजन हे पदयात्रा, बस आणि अन्य मार्गांनी यात्रेची सोबत करणार आहेत. कलकत्ता इथं रेल्वेने पोहोचल्यावर येथील महात्मा गांधी प्रेरणा केंद्रापासून प्रत्यक्षात सायकल चालविण्यास आरंभ होणार आहे . भारत आणि बांगलादेशात सुमारे 1600 किलोमीटर अंतर कापून सर्व सायकल यात्री 29 सप्टेंबरला नोखाली इथं महात्मा गांधी आश्रमात पोहोचतील. इथं आयोजित तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय युवक संमेलनात सर्व सायकल यात्री भारताचे प्रतिनिधित्व करतील.
बांगलादेश सरकारने या उपक्रमासाठी प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांना आगमन विसा ( Visa on Arrival ) देऊ केला आहे. यात पद्मभूषण अण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार, प्रख्यात चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शिका स्वाती भटकळ, पाणी फाउंडेशनचे प्रमुख सत्यजित भटकळ , बाबा आमटे यांचे सहकारी नरेंद्र मिस्त्री आणि दगडू लोमटे, पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश शेठ आणि किरीटी मोरे, भाईजी डॉ. एस. एन. सुबराव यांचे ज्येष्ठ अनुयायी ओरिसामधील मधुभाई दास, कलकत्ता इथल्या समरीटन हेल्थ मिशनचे मामून अख्तर, खालिद मजहर आदींचा समावेश आहे. संपूर्ण रस्त्यात विविध सामाजिक संस्था, सद्भाव जपणारे लोक यांच्याकडेच भोजन आणि निवास यांची सोय करण्यात आली आहे. समाजाच्या सर्व स्तरातील समाजघटकाना आणि 25 हून अधिक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यात्रेत सहभागी झाले आहेत.
बांग्लादेशात राजेशाही, ढाका, नोखाली आदी 7 विद्यापीठातून हे यात्री युवासंवाद कार्यक्रम करणार आहेत. अहमदनगरमधील पंडित पवन नाईक आणि त्यांचे 9 सहकारी यांच्या सुफी संगीताचे 3 जलसे नोखाली आणि ढाका इथं आयोजिण्यात आले आहेत. ढाका येथील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने पुढाकार घेऊन ढाका येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र इथं 3 ऑक्टोबरला मोठा कार्यक्रम होणार आहे. बंगालमधील वरिष्ठ सनदी अधिकारी संजय थाडे यांचे विशेष मार्गदर्शन या यात्रेला मिळाले आहे. श्री समर्थ विद्या मंदिर आणि हिंद सेवा मंडळाच्या सारडा महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थीही या उपक्रमात सहभागी झाले आहेत.