Ahmednagar News ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्त केलेल्या भरारी पथकाने नगर शहरातील एका हॉटेलच्या रूममधून तिघांना 60 हजार रूपयांच्या रोख रकमेसह सोमवारी (दि. 29) रात्री ताब्यात घेतले होते. याप्रकरणी रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल बबन झावरे (रा. पारनेर), अनिकेत राजु यादव (रा. भिंगार) व विशाल गोविंद चिवडे (रा. मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीस अंमलदार सतीष शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. एका हॉटेलच्या रूममध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांचे वाटप सुरू असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती. पथकाने तत्काळ सदर रूमवर छापा टाकून तिघांना 60 हजार रूपयांच्या रकमेसह पकडले.
कोतवाली पोलिसांच्या त्यांना ताब्यात देण्यात आले होते व त्यांच्याकडे सापडलेल्या रोख रकमेबाबत उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम संयुक्तिक कारण न देता जवळ बाळगताना मिळून आल्याचे यासंदर्भातील फिर्यादीत म्हटले आहे. सहायक फौजदार राजेंद्र गर्गे याप्रकरणी तपास करत आहेत.