Lok Sabha Elections2024 ः लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने नगर जिल्हा पोलीस दल अॅक्शन मोडमध्ये आलेत. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी नगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडली. यात विशेष करून हातभट्टी दारू, अवैध विदेशी दारू आणि जुगार चालकांविरोधात कारवाई केली गेली. या कारवाईवरून नगर जिल्ह्यात अवैध धंदे जोरात सुरू असल्याची पुष्टी मिळते. लोकसभा निवडणुकीपुरती ही कारवाई नको, तर त्यात सातत्य हवे, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना दिलेल्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी या कारवाईसाठी विविध पथके तयार केली आहेत. गेल्या तीन दिवसात पथकांने 66 गुन्हे दाखल करत 78 जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत तब्बल 12 लाख 60 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दारुबंदीच्या कारवाईमध्ये कोतवाली आणि शनिशिंगणापूर प्रत्येकी एक, भिंगार कॅम्प तीन, सोनई, राहुरी, श्रीगोंदा आणि सुपा प्रत्येकी चार, शेवगाव, नगर तालुका, नेवासा, आणि एमआयडीसी प्रत्येकी पाच, कोपरगाव आणि राहाता प्रत्येकी दोन, संगमनेर शहर हद्दीतील पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दारूबंदीच्या कारवाईत पोलिसांनी तब्बल नऊ लाख 77 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जुगाराविरोधात कारवाई करताना तेफखाना चार, संगमनेर शहर, शेवगाव, सोनई आणि संगमनेर तालुका प्रत्येकी दोन, भिंगार कॅम्प आणि सुपा प्रत्येकी एक, अशा एकूण 14 कारवाई करण्यात आल्या. या कारवाईत दोन लाख 82 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुका जशा जवळ येतील, तशी कारवाई अधिक वेगवान होईल. प्रतिबंधात्मक कारवाईसाठी देखील प्रस्ताव तयार केले जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली.