Rahuri News ः मोटारसायकल खरेदी विक्री करणाऱ्या एजंटकडे विक्रीस असलेली मोटारसायकल विकत घ्यायची, असे सांगून चक्कर मारण्यासाठी गेलेला भामटा तसाच मोटारसायकल घेऊन पसार झाला. ही घटना राहुरी फॅक्टरी येथे घडली. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुनील डॅनियल शेंडगे (वय ५०) हे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे राहतात. त्यांचे राहुरी फॅक्टरी कारखान्याच्या पंपासमोर साई अँटो नावाने गाड्या खरेदी विक्री व सर्व्हिसिग गॅरेज आहे. सुनील शेंडगे यांच्या साई अँटो गॅरेज तेथे एक अनोळखी भामटा त्याच्या ताब्यातील मोपेड वाहन घेऊन आला.
सुनील शेंडगे यांना त्याने मोमीन आखाडा येथून आल्याचे सांगितले. मला गाडी घ्यावयाची आहे. तुमच्याकडची मोटारसायकल मला आवडली आहे. मी चक्कर मारून पाहतो. असे सांगून तो भामटा सुनील शेंडगे यांच्याकडे विक्रीस असलेली मोटारसायकल घेऊन चक्कर मारण्यासाठी घेऊन गेला. मोटारसायकल घेऊन गेला तो, परत न येता तसाच पसार झाला.
सुनिल शेंडगे यांनी थोडावेळ वाट पाहिली. पण तो परत आला नाही. तेव्हा शेंडगे यांनी त्याचा परिसरात शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. तसेच त्या भामट्याची मोटारसायकल चोरून घेऊन निघून गेला. सुनिल शेंडगे यांनी काल राहुरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.