स्पर्धा परीक्षांमध्ये हायटेक काॅपी करण्याचे प्रकार काही थांबायला तयार नाहीत. तलाठी भरतीच्या परीक्षेनंतर आता कृषी विभागाच्या भरती परीक्षेत काॅपी झाली आहे. नाशिकच्या म्हसरूळ पाेलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांला इलेक्ट्राॅनिक्स साधनांसह अटक केली आहे. सूरज विठ्ठलसिंग जारवाल (वय 23, रा. बदनापूर, जालना) याला अटक केली आहे.
कृषी विभागातील विविध पदांच्या ऑनलाईन परीक्षेत इलेक्ट्राॅनिक्स साहित्य घेत परीक्षा केंद्रात सूरज जारवाल आला हाेता. परीक्षा हाॅलमध्ये त्याच्या हालचाली संशयास्पद हाेत्या. सुरक्षारक्षकांनी त्याला विचारणा केल्यावर त्याने पळ काढला. सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केल्यावर ताे नीट उत्तर देत नव्हता. त्याची चाैकशी केल्यावर त्याच्याकडे माेबाईल आणि पायातील सॅन्डलमध्ये एक इलेक्ट्राॅनिक्स डिव्हाइस लपविल्याचे आढळून आले. कपड्याच्या आतील बाजूला एक पाकीट हाेते. छायाचित्र काढण्यासाठी त्याने पाकिटाला छिद्र पाडलेले हाेते. सुरक्षारक्षकांना संशळ बळावल्याने त्यांनी पाेलिसांना बाेलावून घेतले.
म्हसरूळ पाेलिसांनी सूरज जारवाल याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे पाेलिसांनी कसून चाैकशी सुरू केली. सूरजने या चाैकशीत हायटेक काॅपीचा प्रकाराची माहिती दिली. यानंतर पाेलिसांनी त्याच्याविराेधात विविध कलमांतर्गत गुन्हा नाेंदवला आहे. सूरज जारवाल हा पाेलिस काेठडीत असून, त्याच्या साथीदारांचा शाेध पाेलिसांकडून सुरू आहे.