Distribute a set of inspirational books ः “समकालीन प्रकाशनतर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी विविध उपक्रमशील पुस्तकांचे वितरण केले जात आहे. ‘जागर वाचनाचा’ हा उपक्रम स्तुत्य आहे”, असे प्रतिपादन राहुरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे यांनी केले. ‘जागर वाचनाचा’ उपक्रमांतर्गत राहुरी तालुक्यातील 22 शाळांना ग्रंथालयासाठी प्रेरणादायी पुस्तकांचा संच प्रदान करण्याच्या कार्यक्रमात बोलत होते.
गटशिक्षणाधिकारी तुंबारे म्हणाले, “वाचन हा राज्य प्राप्तीचा मार्ग आहे. वाचनाने मनुष्य प्रगल्भ होतो. मोबाईल वापरामुळे वाचन कमी होत आहे. वाचन प्रेरणा रुजवण्यासाठी समकालीन प्रकाशन करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. शालेय वयात वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी समकालीन प्रकाशनाने दिलेला प्रेरणादायी पुस्तकांचा संच निश्चितच उपयुक्त ठरेल”.
शिक्षण विस्तार अधिकारी सुमन सातपुते, केंद्रप्रमुख हनुमंत चौधरी, केंद्रप्रमुख अशोक शेळके, राहुरी शिक्षक मित्र मंडळाचे अध्यक्ष रवींद्र अरगडे, मच्छिंद्र लोखंडे उपस्थित होते. समकालीन प्रकाशनतर्फे संच उपलब्ध करून देण्यासाठी राहुरी शिक्षक मित्र मंडळाचे अध्यक्ष रवींद्र अरगडे, गणेश शिंदे, अनिल विधाते आदींनी प्रयत्न केले. गणेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. देवेंद्र विघ्ने यांनी आभार मानले.
उपक्रमासाठी यांचे अर्थसहाय्य मिळाले
जागर वाचनाचा उपक्रमांतर्गत प्रेरणादायी पुस्तकांचा संच शाळांना मोफत वितरित करण्यासाठी अनिकेत पाध्ये (मुंबई), दीपक गाडेकर (ठाणे), मीनल वागळे (मुंबई), सुरेश वाघ (मुंबई), विराज टाकळकर (पुणे), संजीव सावंत (मुंबई) महेश लहुरीकर (पुणे), आश्विनी हर्डीकर (पुणे), भाग्यश्री देवधर (ठाणे) अर्थसहाय्य मिळाले.