मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी (ता. राहाता) इथं 17 ऑगस्ट 2023 जिल्हास्तरीय शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. परिसरामध्ये विविध विभागांच्या 80 स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. त्यामध्ये कृषी विभागाच्याही चार स्टॉलचा समावेश होता. या स्टॉलमधून कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माहितीचे फलक उभारण्यात आले होते. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळे, भाजीपाला, तृणधान्य, फुले यांचे उत्कृष्ट नमुन्यांचे प्रदर्शन तसेच रानभाज्यांचे आहारातील महत्व लक्षात घेता जिल्ह्यात मान्सून हंगामात उत्पादीत होणाऱ्या रानभाज्यांचा महोत्सवही या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. याला शेतकऱ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आंतरराष्ट्रीय पोष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त आहारातील तृणधान्यांचे महत्व पटवून देण्यासाठी कृषी विभागाने तृणधान्याच्या मंगल कलशाची निर्मिती केली होती. हा मंगल कलश शेतकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
शेतकऱ्यांना शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी कृषी आणि कृषी निगडीत असणाऱ्या विविध विभागांच्यावतीने अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देत त्यांचे जीवन अधिक सुखकर बनवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला शासकीय योजनांची साथ लाभत असल्याचा प्रत्यय “शासन आपल्या दारी” उपक्रमातून पहावयास मिळाला. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या “शासन आपल्या दारी” उपक्रमांतून तब्बल 12 लाख 10 हजार 768 शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देत कृषी विभागाने एक उच्चांक गाठला आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजनेतून 4 हजार 876 शेतकऱ्यांना लाभ
कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, पावर टिलर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, कल्टीवेटर, रोटावेटर इत्यादी प्रकारची यंत्र अवजारे शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर लाभ देण्यात येतो. योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प महिला शेतकरी यांना 50 टक्के अनुदान तसेच इतर बहुभुधारक शेतकरी यांना 40 टक्के अनुदान वितरित करण्यात येते. “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत 4 हजार 876 शेतकऱ्यांना 35 कोटी 82 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून 48 कोटीचा लाभ
“शासन आपल्या दारी” उपक्रम कालावधीमध्ये मागेल त्याला सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत 6 हजार 505 शेतकऱ्यांना 19 कोटी 96 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना पूरक अनुदान अंतर्गत 24 हजार 300 शेतकऱ्यांना 28 कोटी 51 लाख एवढे अनुदान वितरित करण्यात आले. 551 शेतकऱ्यांना सामूहिक शेततळे या योजनेअंतर्गत “शासन आपल्या दारी” उपक्रम कालावधीत मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत 551 शेतकऱ्यांना 4 कोटी 58 लक्ष रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून लाभ
“शासन आपल्या दारी” उपक्रम कालावधीत कांदाचाळ घटकासाठी 360 शेतकऱ्यांना 3 कोटी 5 लाख, मागेल त्याला अस्तरीकरण घटकासाठी 227 शेतकऱ्यांना 1 कोटी 55 लाख, मागेल त्याला हरितगृह शेडनेट घटकासाठी 45 शेतकऱ्यांना 36 लाश एवढे अनुदान वितरित करण्यात आले आहे. मागेल त्याला फळबाग लागवड घटकासाठी 23 शेतकऱ्यांना 10 लाख एवढे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
पीएमएफएमई योजनेतून 81 शेतकऱ्यांना लाभ
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उन्नयन योजना (पीएमएफएमई) योजनेतून उपक्रम कालावधीमध्ये अन्नप्रक्रिया अंतर्गत 81 शेतकऱ्यांना 5 कोटी 53 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
एक रुपयात पिक विमा
प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2023-24 अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यामध्ये यावर्षी एकूण 11 लाख 73 हजार 747 शेतकऱ्यानी सहभाग घेतला आहे. यामध्ये 6 लाख 77 हजार 490 हेक्टर क्षेत्रावर विमा उतरवलेला आहे. यासाठी केंद्र सरकारचे 175 कोटी व राज्य शासनाचे 277 कोटी 2 लाख, असा एकूण 452 कोटी 14 लाख हिस्सा समाविष्ट आहे. एकूण विमा संरक्षित रक्कम 3 हजार 326 कोटी 64 लाख एवढी आहे.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) योजनेतून 7 कोटीचा लाभ
लहान आणि सिमांत शेतकरी तसेच कृषि नव उद्योजकांना केंद्रस्थानी ठेऊन शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासास मदत करण्यासाठीच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) योजनेतून “शासन आपल्या दारी” उपक्रमामध्ये अन्न प्रक्रिया अंतर्गत 37 शेतकरी उत्पादक कंपन्यांना 7 कोटी 54 लाख रुपयांच्या अनुदानाचे वितरण करण्यात आले. आपल्याकडे जेवण झाले की अन्नदाता सुखी भव म्हणण्याची पद्धत आहे. जो कष्ट करुन ऊन, पाऊस,वारा सहन करुन अन्न पिकवतो, त्या अन्नदात्या शेतकऱ्याचे एक प्रकारे आभार व्यक्त करणे किंवा आपली सकारात्मकता त्याच्या पाठीशी देणे हाच यामागचा हेतु आहे. परंतु आता फक्त तेवढेच पुरेसे नाही. शेती आणि शेतकरी अधिक समृद्ध व्हावा यासाठी शासन शेतकऱ्यांप्रती अधिक सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी आग्रही आहे. जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या “शासन आपल्या दारी” या उपक्रमातुन शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात भरीव मदत उपलब्ध करुन देण्यात आली हे या उपक्रमाचे यशच म्हणावयास हरकत नाही.
-अमोल शिवकांत महाजन
माहिती अधिकारी,जिल्हा माहिती कार्यालय, अहमदनगर