अहमदनगर शहरातील नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाला उच्चांकी भाव मिळाला आहे. शेतकरी शरद राेडे यांच्या मुगाला प्रति क्विंटल 11 हजार 111 रुपये भाव मिळाला आहे.
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार बाजारात आज मुगाचे बाेली पद्धतीने लिलाव झाला. यात चांगल्या दर्जाच्या मुगाला उच्चांकी भाव मिळाला. भुसार बाजारातील भागवत काेथंबिरे यांच्या आडतीवर मुगाचे लिलाव झाले. यात शरद राेडे यांच्या मुगाला उच्चांकी भाव मिळाला. हा मूग उच्च प्रतिचा हाेता. त्यामुळे खरेदी करताना भावाचे काहीच वाटले नाही, अशी प्रतिक्रिया व्यापारी भागवत काेथंबिरे यांनी सांगितले.
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजारात 110 क्विंटल मुगाची आवक झाली हाेती. मुगाच्या प्रतवारीनुसार भाव हा सरासरी सात ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा गेल्याचे बाजार समितीच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्री करीता बाजार समितीत आणावा. दलालांकडून जास्त दराच्या नावाखाली फसवणूक हाेऊ शकते. बाजार समितीत शेतमालाला जास्त दराचा फायदा घ्यावा, असे आवाहन सभापती भाऊसाहेब बोठे यांनी केले.
मुगाच्या लिलावावेळी उपसभापती रभाजी सुळ, सचिव अभय भिसे व अधिकारी वर्ग उपस्थित होते.