भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या जी-20 शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षीय भाषणाने सुरुवात झाली. 21 साव्या शतकासाठी शाश्वत विकासाची उद्दिष्टं गाठणे, शाश्वत भविष्यासाठी हरित विकास तसंच बहुराष्ट्रीय संस्थांना बळकट करण्याचा प्रयत्न या परिषदेत केला जाणार आहे. आजच्या पहिल्या दिवशी नवी दिल्ली ‘लिडर्स डिक्लरेशन’ला सर्व सहमती मिळाल्याने जी-20 शिखर परिषदेचे हे ऐतिहासिक यश आहे.
कोरोनानंतर जगामध्ये सर्वत्र एक अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आपण कोरोनावर जशी यशस्वी मात केली, तशी एकत्र येऊन वैश्विक अविश्वासावर मात करू शकतो. असे सांगून, वैश्विक अविश्वासाला पुन्हा एकदा विश्वासामध्ये परिवर्तित करण्यासाठी सर्व जगाने एकत्र येण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.जी-२० राष्ट्रप्रमुखांच्या दोन दिवसांच्या शिखर परिषदेला नवी दिल्लीत विशेष उभारण्यात आलेल्या ‘भारत मंडपम्’, इथं सुरुवात झाली. त्यावेळी ते उपस्थित नेत्यांना संबोधित करत होते. परिषदेच्या पहिल्या सत्राचा विषय ‘वन अर्थ’, होता.
पंतप्रधान नरेंद्र माेदी म्हणाले, “आजच्या काळामध्ये सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हा मंत्र संपूर्ण जगाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल”. विकसित आणि विकसनशील राष्ट्रांमधील दरी कमी करण्यासाठी भावी पिढ्यांकरिता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. जगाला नवी दिशा देण्यासाठी 21 वं शतक महत्त्वाचे आहे. जुन्या प्रश्नांवर नवीन उपाययोजना करण्याचा हा काळ आहे आणि त्यामुळे मानवकेंद्रीत दृष्टिकोनासह आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण पुढे गेले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र माेदी म्हणाले.
भारताची ब्रिटन, जपान, बांग्लादेश, माॅरिशससह इतर देशांची द्विपक्षीय चर्चा
जी-20 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळया राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा केली. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि पंतप्रधान मोदी यांनी द्विपक्षीय व्यापारी संबंध वृध्दींगत करण्याबाबत आणि गुंतवणुकीला चालना देण्याविषयी चर्चा झाीली. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याशी पंतप्रधान मोदी यांनी संपर्क, वाणिज्य आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा केली. पंतप्रधानांनी काल बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. दळणवळण, दोन्ही देशातली व्यावसायिक भागीदारी अशा विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्यासोबतही मोदी यांनी बैठक घेतली. पायाभूत सुविधा, वित्त तंत्रज्ञान, सांस्कृतिक आणि इतर क्षेत्रातल्या दोन्ही देशांमधल्या सहकार्याबद्दल यावेळी चर्चा केली.
जागतिक जैवइंधन आघाडीची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक जैवइंधन आघाडीची घोषणा केली. भारतासह 11 देश या आघाडीत सहभागी झाले आहेत. कॅनडा आणि सिंगापूर निरीक्षक देश म्हणून आघाडीत सामील झाले आहेत. पंतप्रधानांनी जगातल्या सर्व देशांना या आघाडीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मानवी आरोग्याबरोबरच मृदेचे आणि पृथ्वीचे आरोग्य जपण्यासाठी भारतात मोठे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान, सौर ऊर्जा प्रकल्प, नैसर्गिक शेती यावर भारताचा भर आहे. पेट्रोलमधलं इथेनॉलचे प्रमाण 20 टक्के करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला आहे. त्याला सर्व देशांनी सहकार्य करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले.
पायाभूत सुविधा आणि गुंतवणूकीसाठी जागतिक भागीदारी
जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभूत सुविधा आणि गुंतवणूकीसाठी जागतिक भागीदारी तसेच भारत-मध्य, पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरचा प्रारंभ झाला. मजबूत संपर्क व्यवस्था असावी यावर आपला कटाक्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या संपर्क व्यवस्थेला कोणत्याही क्षेत्रीय सीमा नसाव्यात, असे पंतप्रधान नरेंद्र माेदी म्हणाले. आंतरराष्ट्रीय नियम आणि कायदे पाळले जावेत, सार्वभौमता आणि अखंडता यांचा मान राखला जावा, आर्थिक व्यवहार्यता जपली जावी, तसेच पर्यावरणाच्या सर्व मापदंडाचे पालन व्हावे, अशा अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी व्यक्त केल्या.