Ahmednagar Lok Sabha 2024 ः वाहनांचे अडथळे, रस्ते बंद करावे लागणे, रणरणते ऊन, गावोगावी हनुमान जयंतीचे सुरू असलेले कार्यक्रम यामुळे गैरसोय टाळण्यासाठी राहुल गांधींना आणले नाही व साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला, असे स्पष्टीकरण महाविकास आघाडीचे नगर दक्षिणेचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांनी दिले. दरम्यान, स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या समारोपातच आम्ही शक्तीप्रदर्शन केले आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
चुकीच्या माणसाला प्रश्न
महायुतीच्या सभेला अजितदादा का आले नसावेत, असा प्रश्न विचारल्यावर माजी आमदार लंके म्हणाले, हा प्रश्न तुम्ही चुकीच्या माणसाला विचारताय. ते त्यांनाच विचारले पाहिजे. दुसर्या पक्षाबद्दल मी काही बोलू शकत नाही, असे बोलून अजित पवारांबद्दल बोलणे त्यांनी टाळले.
महाविकास आघाडीकडून माजी आमदार लंके यांनी आज मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अंध असलेले विष्णु महाराज दुकळे (शेवगाव) व सुनील करंजुले (रा. पाडळी रांजणगाव, पारनेर) या दिव्यांगांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख संभाजी कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आदींसह अन्य उपस्थित होते. अर्ज भरण्यासाठी सर्व येत असताना राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे दिसले. मात्र, प्रत्यक्ष अर्ज भरतेवेळी ते नव्हते. तसेच कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारही अनुपस्थित होते.
वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न
उमेदवारी दाखल केल्यानंतर माजी आमदार लंके यांनी माध्यमांशी संवाद साधला. सोमवारी महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नो लंके-ओन्ली विखे, असे भाष्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना लंके म्हणाले, माझे व मुख्यमंत्र्यांचे चांगले संबंध आहेत. मी त्यांना थेट भेटू शकतो व फोन करून त्यांच्याशी बोलूही शकतो. त्यामुळे माझ्यात व त्यांच्यात वितुष्ट निर्माण करण्याचा कोणी करू नये. मी त्यांना जवळून ओळखतो, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी लंका दहनाविषयी केलेल्या भाष्याबद्दलही, एखाद्याच्या व्यासपीठावर गेल्यावर असे बोलावेच लागते, असा दावाही लंकेंनी केला.
माझी लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची आहे. आर्थिक व राजकीय सत्तेचा गैरवापर होणार हे भाकीत मी सुरुवातीलाच केले होते. लंकेला गुंड म्हटले गेले, पण मी गुंड आहे का? मला इंग्रजी येत नाही, असेही बोलले गेले. उद्या माझ्या चारित्र्यावर संशय घेणारे अस्त्र बाहेर काढतील. ही निवडणूक लढवण्याची पद्धत आहे का?, असा सवाल करून लंके म्हणाले, मतदार संघातील दहशत संपवण्यासाठी माझी उमेदवारी आहे. विकासाची घोडदौड सुरू करणार आहे. मला शक्तीप्रदर्शनाची गरज नाही. स्वयंस्फूर्तीने लोक माझ्यासमवेत आहेत. भाडोत्री लोक आणण्याची गरज नाही. त्यांनी केटरिंगवाल्याला पैसे दिले नाहीत. असे लोक त्यांच्या सभेला होते, अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाद्वारे लंकेंना चांदीची गदा देण्यात आली.