Ahmednagar Political ः पारनेर तालुक्यातील अनेक कंपन्यांचे प्रमुख निलेश लंके व त्यांच्या समर्थक गुंडांमुळे त्रस्त असून, पोलिस संरक्षण मिळाले नाही व पाठीशी कोणी उभे राहिले नाही तर आमचे उद्योग बाहेर न्यावे लागतील, असे खासगीत सांगत असल्याचा दावा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी सोमवारी येथे केला. दरम्यान, महायुती उमेदवार डॉ. सुजय विखे यांना गोळ्या घालण्याचे भाष्य असणार्या वादग्रस्त क्लिपमागील सूत्रधार व कर्ता करविता शोधून त्याच्यावर कारवाईची मागणीही कर्डिलेंनी केली.
पारनेर पंचायत समितीचे माजी सदस्य निवृत्ती घाडगे यांच्या आवाजातील वादग्रस्त ऑडियो क्लिप रविवारी सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र, त्यानंतर काही वेळातच त्यांनी संबंधित क्लिप आपली नाही व बनावट असून, त्याविरोधात पोलिसात तक्रार देण्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर माजी आमदार शिवाजी कर्डिले व आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नगर शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, शिंदेसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाबूशेठ टायरवाले, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अनिल शिंदे, निखील वारे, विनायक देशमुख, गणेश भोसले उपस्थित होते.
कर्डिलेंचा घणाघात
निवेदन दिल्यावर माध्यमांशी बोलताना कर्डिले यांनी निलेश लंके व त्यांच्या समर्थकांवर घणाघात केला. सुपा एमआयडीत जाऊन खासगीत त्यांच्या मालक व अधिकार्यांशी बोलले तर लंके पारनेरचे आमदार झाल्यापासून तेथील उद्योगांना सुरू झालेल्या त्रासाची माहिती ते देतील, असा दावा करून कर्डिले म्हणाले, यांना विचारल्याशिवाय कंपन्यांना काही करता येत नाही. एमआयडीतून तरुणांना रोजगार मिळणे गरजेचे असताना, यांना फक्त स्वतःला काय मिळेल, याचा विचार असतो. त्यामुळे यांच्यापासून संरक्षण व कोणी पाठीशी उभे राहिले नाही तर कंपन्या बाहेर न्याव्या लागतील, असे उद्योजक बोलत आहेत, असा दावा कर्डिलेंनी केला.
पारनेरला पोलिस फौज वाढवा
डॉ. विखे यांना गोळ्या घालण्याबाबतची क्लिप समोर आल्यावर पारनेर तालुक्यातील अनेकांचे फोन आले. त्यांनाही अशाच पद्धतीने धमक्यांचे फोन आले आहेत व येत आहेत. संपूर्ण पारनेर तालुका भीतीच्या सावटाखाली आहे. त्यामुळे या तालुक्यात पोलिसांची फौज वाढवण्याची मागणी प्रशासनाकडे केल्याचे सांगून कर्डिले म्हणाले, नाना घाडगे नावाच्या लंके समर्थकाने गणेश नावाच्या भाजप पदाधिकार्याला धमकी देताना डॉ. विखे यांच्यावर गोळ्या झाडण्याची भाषा केली आहे. हा नाना घाडगे रविवारी राहुरीमध्ये लंके व आ. प्राजक्त तनपुरे यांच्यासमवेत होता. त्यासंदर्भातील फोटो व व्हीडीओही पोलिस व जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे त्याच्यावर व त्याच्या पाठीशी असणारा सूत्रधार आणि कर्ता करविता यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे तसेच महायुतीचे उमेदवार डॉ. विखे यांना झेड दर्जाची सुरक्षा द्यावी व भाजप कार्यकर्ता गणेश यालाही सुरक्षा देण्याचीही मागणी केल्याचे कर्डिलेंनी सांगितले.
आवश्यक कार्यवाही करू
हुकूमशाही पद्धतीने आवाज दाबण्याचे प्रयत्न असल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यात भीतीचे वातावरण आहे. आमच्या उमेदवारावर प्रचार व मतदारांशी संपर्क कसा करावा, असा प्रश्न असल्याने त्या ऑडिओ क्लिपमागील कर्ता करविता व सूत्रधार शोधा आणि गुंड प्रवृत्तींचा छडा लावावा, अशी मागणी कर्डिले यांनी केली. यावेळी बोलताना पोलिस अधीक्षक ओला यांनी, यासंदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची ग्वाही दिली.