Ahmednagar News ः अहमदनगरमधील संपदा नागरी सहकारी पतसंस्था घोटाळाप्रकरणी दोषी ठरलेला ज्ञानदेव सबाजी वाफारे (वय 49, रा. कान्हूरपठार) याच्यासह त्याची पत्नी सुजाता ज्ञानदेव वाफारे (रा. कान्हूर पठार) या दोघा प्रमुख आरोपींसह व्यवस्थापक रवींद्र विश्वनाथ शिंदे (वय 37, रा.सावेडी), सोने तारण विभागाचा शाखा व्यवस्थापक साहेबराव रामचंद्र उर्फ बाळासाहेब भालेकर (वय 36, रा. कान्हूर पठार) व कर्जदार संजय चंपालाल बोरा (वय 36, रा. यशवंत कॉलनी, नगर) या पाचजणांना जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडे यांनी निकाल दिला. अन्य 12 आरोपींना विविध कलमान्वये तीन ते 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणातील फरार आरोपींविरुद्ध अटक वॉरंट जारी करून त्यांना पकडावे आणि त्यांच्याविरुद्ध दोषारोप पत्र दाखल करून खटला चालवण्याचे आदेशही न्यायालयाने दिला.
संपदा पतसंस्थेतील गैरव्यवहारासंदर्भात 13 वर्षांपूर्वी कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी पूर्ण झाल्यावर दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले होते. त्यानंतर त्यांच्या शिक्षेसंदर्भातील युक्तिवाद सोमवारी (8 एप्रिल) झाला. न्यायालयाने स्वतः सर्व आरोपींचे शिक्षेबद्दलचे म्हणणे जाणून घेतले. तसेच सरकारी वकील अॅड. अनिल ढगे, अवसायकांच्यावतीने काम पाहणारे अॅड. सुरेश लगड व ठेवीदारांच्यावतीने काम पाहणार्या अॅड. अनिता दिघे यांनीही शिक्षेसंदर्भात युक्तिवाद केला. आरोपींच्या वकिलांचेही म्हणणे न्यायालयाने जाणून घेतले. अनेक संचालक वयोवद्ध आहेत. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, त्यामुळे त्यांना कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली तर आरोपींनी गरीब ठेवीदारांचे पैसे हडप केले. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, असा सरकार पक्षाने युक्तिवाद केला. त्यानंतर आज बुधवारी दुपारी 12 वाजता जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडे यांनी आरोपींना शिक्षा सुनावली.
आरोपी व त्यांना झालेली शिक्षा
संपदा पतसंस्थेचा संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव सबाजी वाफारे, त्याची पत्नी सुजाता ज्ञानदेव वाफारे, शाखा अधिकारी रवींद्र विश्वनाथ शिंदे, शाखा अधिकारी साहेबराव भालेकर व कर्जदार संजय चंपालाल बोरा या पाचजणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तर पतसंस्थेचा संचालक सुधाकर परशुराम थोरात (रा. पिंपरी गवळी, पारनेर), भाऊसाहेब कुशाबा झावरे (रा. वासुंदा, पारनेर), दिनकर बाबाजी ठुबे (रा. कान्हूर पठार, पारनेर), राजे हसन अमीर (रा. पेट्रोल पंपासमोर, पारनेर), बबन देवराम झावरे (रा. कान्हूर पठार, पारनेर), लहू सयाजी घंगाळे (रा. हिवरे कोर्डा, पारनेर), हरिश्चंद्र सावळेराम लोंढे (रा. कान्हूर पठार, पारनेर), अनुप प्रवीण पारेख (रा. खिस्तगल्ली, नगर), सुधाकर गोपीनाथ सुंबे (रा. पाडळी, पारनेर), गोपीनाथ शंकर सुंबे (रा. पाडळी, पारनेर), महेश बबन झावरे (रा. गारगुंडी, पारनेर) व संगीता हरिश्चंद्र लोंढे (रा. केडगाव, नगर) या बाराजणांना विविध कलमांन्वये 3 ते 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. संपदा गैरव्यवहार प्रकरणी 28जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील चार आरोपींचा मृत्यू झालेला आहे तर 7जण अजूनही फरार आहेत. राहिलेल्या 17 आरोपींपैकी पाचजणांना न्यायालयाने जन्मठेप व 12जणांना विविध कलमान्वये सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
…अन् वाफारे रडला
संपदा गैरव्यवहार प्रकरणाचा निकाल असल्याने जिल्हा न्यायालयात ठेवीदार व आरोपींच्या नातेवाईकांची गर्दी झाली होती. पोलिस बंदोबस्तात दुपारी 12च्या सुमारास आरोपींना न्यायालयात आणण्यात आले. न्यायाधीश नाईकवाडे यांनी विविध कलमांद्वारे कोणत्या आरोपीला किती शिक्षा झाली, याचे वाचन सुरू केले. शिक्षा सुनावली जात असताना मुख्य आरोपी ज्ञानदेव वाफारे एकटाच उभा राहून रडत होता. शिक्षा सुनावल्यानंतर, सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत, ज्या आरोपींना जामीन दिले आहेत, ते रद्द करण्यात आले आहेत. फरार आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करून त्यांच्याविरुद्ध खटला चालवला जावा व फरार आरोपींच्या अटकेचे वॉरंट जिल्हा पोलिस अधीक्षकांनी काढून त्यांना पकडण्याचे आदेश न्यायालयाने दिले.