Ahmednagar News ः अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी गावातील पाच जणांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही विहीर गाळाने भरलेली होती. गाय-म्हशीचे शेण, पाचट या विहिरीत टाकत असल्याने त्यातून तयार झालेल्या वायूमुळे गुदमरून या पाच जणांचा मृत्यू झाला. गुढीपाडव्याच्या दिवशी ही घटना घडल्याने नेवासा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
विशाल अनिल काळे ऊर्फ बबलू (वय २३), त्याचे वडील अनिल बापूराव काळे (वय ५८), त्यांच्याकडील सालगडी बाबासाहेब पवार (वय ३५), अनिल यांचे चुलत बंधू संदीप माणिक काळे (वय ३६) आणि संदीपचे वडील माणिक काळे (वय ६५) यांचा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. विजय माणिक काळे हा देखील विहिरीत यांना वाचवण्यासाठी उतरला होता. परंतु वायूमुळे त्याला त्रास झाला. त्याला लगेचच विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्याला नगरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अनिल काळे यांच्या घराशेजारी गोठा आहे. या गोठ्याशेजारी जुनी विहिर आहे. तिथे गायी-म्हशीचे शेणकूट, पाचट टाकले जाते. त्यातून विहिरीत गाळ तयार झाला आहे. तसेच विहिरीत वायू तयार झाला आहे. त्यामुळे तिथे सतत दुर्गंधी पसरत असते. विहिरीत एकमेकांना वाचवण्यासाठी एकापाठोपाठ उतरल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. विषारी वायूने बेशुद्ध पडले. त्यानंतर गाळात रुतून मृत्यू झाला.
घटनेची माहिती पसरताच प्रशासनातील प्रमुख अधिकारी, राजकीय नेते, स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रात्री उशिरापर्यंत विहिरीत पडलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. अहमदनगर महापालिकेचे अग्निशमन दलाबरोबर श्रीरामपूर पालिका आणि औरंगाबादहून आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
मांजरीच्या पिलाला वाचण्यासाठी धडपडीत मृत्यूतांडव…
स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत वेगळीच माहिती दिली. या विहिरीतील गाळात मांजराचे पिलू अडकले होते. त्याला वाचविण्यासाठी पहिल्यांदाचा विशाल काळे विहिरीत उतरला. यात तो गाळात रूतल्याचे त्याचे वडील अनिल काळे यांच्या लक्षात आले. विशाल वाचवण्यासाठी अनिल विहिरीत उतरले. ते दोघे विहिरीतून वर आले नाही. हे पाहून शेजारचे वस्तीवरील बाबासाहेब पवार या दोघांना काढण्यासाठी खाली विहिरीत उतरला. तो देखील खाली रुतला. रस्त्याने चाललेल्या अनिल काळे यांचे चुलतबंधू संदीप काळे देखील विहिरीत उतरले. हे चौघे विहिरीतून वर आले नाही, हे पाहून संदीपचे वडील माणिक काळे देखील विहिरीत उतरले. तेही बेशुद्ध होऊन गाळात उतरले. दरम्यान, हे पाच जण विहिरीतून बाहेर आले नाही म्हणून, विजय काळे यांना कंबरेला दोरी लावून विहिरीत सोडले. मात्र त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला लगेचच बाहेर काढले. नेवासे येथे प्राथमिक उपचारानंतर विजय काळे याला नगरमध्ये खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.