Crime News ः संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेहमीच चोऱ्या, मारामाऱ्या, अवैध धंदे याबाबत चर्चेत राहिले आहे. गुरुवारी रात्री मांडवे बुद्रुक येथील शेतातील विहिरीच्या जवळील कोपीमध्ये गावठी पिस्तुलासह पाच जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी अशोक खेमनर याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस कर्मचारी सुभाष बोडखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मांडवे बुद्रुक शिवारातील अनिल काढणे याच्या शेतीमधील विहिरी जवळच्या कोपीमध्ये गावठी बनावटीचे पांढरे धातूचे पिस्तुल आढळले. या पिस्तुलाच्या दोन्ही बाजूला काळसर रंगाची प्लास्टिकची मूठ बसवलेली आहे. या पिस्तुलाची किंमत 20 हजार रुपये आहे. तसेच 1500 रुपये किमतीचे एक पांढरे धातूची मॅक्झिन आणि त्यात पाच जिवंत काडतुसे सापडले आहे.
या जिवंत काडतुसाच्या पाठीमागील बाजूस KF7.65 असे लिहिलेले असून पिस्तुलासह एकूण 21 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अशोक दगडू खेमनर (वय 25, रा. हिरेवाडी, साकुर, ता संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक आहेर हे तपास करत आहेत. अशोक खेमनर याने पिस्तुल आणि त्यासाठी पाच जिवंत काडतूस का आणली असावीत, याचा शोध संगमनेर पोलीस घेत आहे.