Nagar News : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते उद्या रविवार 25 फेब्रुवारीला देशभरातील विविध आरोग्य संस्थांच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचे भूमिपूजन करुन राष्ट्राला समर्पण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दूरस्थ प्रणालीव्दारे राजकोट (गुजरात) येथे सायंकाळी आयोजित केलेला आहे.
महाराष्ट्र राज्यातील पाच जिल्हा रुग्णालयांच्या ठिकाणी 135.05 कोटी रुपये इतक्या रक्कमेच्या कामांचे भूमिपूजन तसेच राज्यातील 88.18 कोटी रुपये किंमतीच्या दहा कामांचे लोकापर्ण यावेळी करण्यात येणार आहे. नगर येथील जिल्हा रुग्णालय परिसरातील नवीन 50 खाटांच्या क्रिटीकल केअर हॉस्पिटल ब्लॉक या इमारती करीता 2 हजार 375 लक्ष रक्कमेच्या कामाच्या भूमिपूजनचा समावेश आहे. या निमित्ताने आरोग्याच्या बाबतीत दर्जेदार सेवा सुविधा जन सामान्याकरीता निशुल्क व प्रभावी पध्दतीने उपलब्ध करुन देऊन विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करण्यात येत आहे.
जिल्हा रुग्णालय नगर येथे या दूरस्थ भूमिपूजनाच्या डिजिटल पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून दुरदृश्य प्रणालीव्दारे कार्यक्रमस्थळी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. जिल्ह्यातील नगर शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी केले आहे.