अहमदनगरच्या नगर तालुक्यातील नारायण डोह इथं डॉ. ना. ज. पाउलबुधे तंत्रनिकेतनमध्ये अभियंता दिनानिमित्त सर डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. एमआयडीसी येथील स्नायडर इंडिया कंपनीचे वरिष्ठ जनरल व्यवस्थापक दिलीप आढाव, प्रोक्टक्शन मॅनेजर राजेंद्र नाईकवाडी, जनरल व्यवस्थापक मॅनेजर सागर ससाणे, प्राचार्य बाळासाहेब बोर्डे, विद्युत विभागाचे विश्वनाथ आदवडे, केमिस्ट्री विभाग प्रमुख रेखा रोटे, स्वाती बोरा, सागर बोठे आदि उपस्थित होते.
दिलीप आढाव म्हणाले, “आपल्यातील कौशल्याला कल्पकतेची जोड देत नवनवीन निर्माण करणार्याला इंजिनिअर म्हटले जाते. आज प्रत्येक गोष्ट ही तंत्रज्ञानयुक्त अशीच निर्माण होत आहे. त्यामुळे भविष्यात इंजिनिअर्सची गरज मोठ्या प्रमाणात भासणार आहे. सर विश्वेश्वरय्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने राष्ट्र निर्माण कार्यात मोठे योगदान दिले आहे”. त्याकाळी आजच्या इतके तंत्रज्ञान विकसित नसतांनाही आपल्या कल्पकतेच्या जोरावर मोठे प्रोजेक्ट निर्माण केले. त्यांच्या प्रति कृतज्ञताभाव व्यक्त करण्यासाठी त्यांची जयंती ही ‘अभियंता दिवस’ म्हणून साजरी केली जाते, असे सांगितले.
प्राचार्य बाळासाहेब बोर्डे यांनी विकसित होत असलेल्या तंत्रज्ञान युगात आपली गुणवत्ता सिद्ध केल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी अभ्यासबरोबरच नवनवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे, असे सांगितले. राजेंद्र नाईकवाडी व सागर ससाणे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना इंजिनअर्सची भविष्यातील गरज आणखी वाढणार असल्याने विद्यार्थ्यांनी आपआपल्या ट्रेडमध्ये नैपुण्य प्राप्त करावे, असे आवाहन केले.
विद्युत अभियांत्रिचा आयटीआयनंतर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या निलेश घोडके यांनीही इंजिनिअरींग बद्दल माहिती दिली. अभियंता दिनाचे औचित्य साधून प्रमुख पाहुणे दिलीप आढाव यांनी तंत्रनिकेतच्या परिसरात लावण्यासाठी 100 वृक्षे भेट दिली. त्याचे वृक्षारोपण करण्यात येऊन विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेतली. रेखा रोटे यांनी सूत्रसंचालन केले. विश्वनाथ आदवडे यांनी आभार मानले.