Nagar News : लोकसभेची आचारसंहिता कधीही लागू शकते. या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारने विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्याचा धडका लावला आहे, तर विकासकामांच्या उद्घाटन सपाटा लावला आहे. भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे, भाजप खासदार सुजय विखे यांनी नगर शहर विकासाला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठा निधी, तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून रस्त्यांसाठी दीडशे कोटींच्या निधीला मंजुरी घेतली. नगर शहराच्या कोणत्या-कोणत्या कानाकोपऱ्यात विकासकामे सुरू आहेत. यातून आता महायुतीत असलेला भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षामध्ये श्रेयवाद रंगू लागला आहे.
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर म्हणाले, “पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नातून पहिल्यांदाच नगर शहरातील विकासकामे नियोजनबद्ध सुरू झाली आहेत. त्यामुळे नगर शहराच्या विकासाचे श्रेय भाजपलाच मिळते”. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आपआपल्या भागामध्येच कामे केली. यामुळे नगर शहराचा विकासाचा समतोल राखला गेला नाही, असे सांगून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासकामाच्या माध्यमातून आत्मनिर्भर व विकसित भारत निर्माण करत आहेत, असेही अभय आगरकर यांनी म्हटले. भाजपच्या या श्रेयवादाचे टायमिंगने मात्र महायुतीतील भाजपचा नगरमधील मित्रपक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
सामाजिक कार्यकर्ते अमित गटणे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांना प्रशासकीय कामाचा दीर्घ अनुभव असल्यामुळेच नगर शहराच्या विकासकामासाठी विविध विभागाच्या माध्यमातून निधी प्राप्त होत असल्याचे सांगितले.
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते मॉडेल कॉलनी येथील ओपन स्पेस सुशोभीकरण कामाचा प्रारंभ, तसेच आसरा आणि हरिप्रिया कॉलनी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा प्रारंभ झाला. माजी नगरसेवक रामदास आंधळे, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रिया जानवे, विवेक नाईक, माजी नगरसेविका संगीता खरमाळे, माजी नगरसेवक नितीन शेलार, संपत नलवडे, सामाजिक कार्यकर्ते अमित गटणे, बापू जानवे, वंदना पंडित, नितीन मोरे, प्रभाकर गवांदे उपस्थित होते.