Ahmednagar News ः स्वयंसेवी संस्थांच्या कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून बँकेकडून 85 लाख रूपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. या प्रकरणी डॉ. राकेश कांतिलाल गांधी (रा. महादेव अर्पाटमेंट, पाईपलाईन रस्ता, सावेडी) आणि डॉ. आशिष अजित भंडारी (रा. सारसनगर, नगर) या दोघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित रसिकलाल कोठारी (रा. माणिकनगर, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
सेवाभावी रेंज फाऊंडेशन सोसायटी आणि शेवगावच्या आखेगावमधील बाबाजी हारजी करपे पाटील प्रतिष्ठान, या दोन्ही स्वयंसेवी संस्था आहेत. साई एंजल स्कूल बाबाजी हारजी करपे पाटील प्रतिष्ठानमार्फत संचलित केले जाते. डॉ. राकेश गांधी आणि डॉ. आशिष भंडारी यांनी 9 ते 12 फेब्रुवारी 2023 दरम्यान दोन्ही संस्थांच्या अटी-शर्तीमध्ये परस्पर बदल केले. एचडीएफसी बँकेच्या स्टेशन रस्ता शाखेत 85 लाख रूपयांचा कर्ज प्रस्ताव साई एंजल स्कूलच्या दोन मजले इमारतीच्या बांधकामासाठी सादर केला.
रेंज फाऊंडेशनचे सदस्य श्वेता अमित कोठारी आणि रसिक चंदूलाल कोठारी (मयत) यांची कोणतीही पूर्व परवानगी न देता, कोणताही ठराव न करता रेंज फाऊंडेशन जामीनदार करून घेतले. रेंज फाऊंडेशनच्या कागदपत्रांमध्ये परस्पर फेरफार करून ते कागदपत्रे खरे आहेत, असे भासवले. बँकेच्या कर्ज प्रस्तावात सादर केला. फाऊंडेशनच्या विश्वस्तांचा कोणताही ठराव न करता डॉ. राकेश गांधी आणि डॉ. आशिष भंडारी यांनी स्वतः कडे फाऊंडेशनचे अधिकार करून घेतले. त्यामुळे श्वेता कोठारी, रसिक कोठारी (मयत) आणि आपला विश्वासघात करून फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात विश्वासघात, फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शीतल मुंगडे तपास करीत आहेत.