अहमदनगर सावेडी पाईपलाईन रोडवरील श्री तुळजाभवानी मंदिर येथे जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला व सौ. ओला यांच्या शुभहस्ते घटस्थापना झाली. तुळजाभवानी मंदिराचे संस्थापक, अध्यक्ष अशोक कानडे व सुनिता कानडे आदी उपस्थित होते. या घटस्थापनेच्या नंतर नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला. या वर्षी मंदिरामध्ये विविध धार्मिक तसेच दसऱ्याला भव्य रावण दहन व दसरा मेळावा होणार असल्याचे अशोक कानडे यांनी सांगितले. यामध्ये खालीलप्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा असून रोजच्या सायंकाळच्या आरतीनंतर परमपूज्य गजानन दादा शास्त्री महाराज यांच्या प्रवचनातून देवी माहात्म्य या विषयावर प्रबोधन होणार आहे.
रविवारी (ता. 15) ते सोमवार (ता. 23) या कालावधीत विविध भजनी मंडळाचे कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय दुर्गा सप्तशती पाठ, सामुदायिक कुंकूमार्चन सोहळा, नवचंडी महायज्ञ असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मंगळवारी (ता. 24) सकाळी नऊ वाजता सामुदायिक शस्त्र पूजन सोहळा, सायंकाळी सहा वाजता सीमोल्लंघन व रावण दहन होणार आहे. याचवेळी सायंकाळी सात वाजता विचार भारती आयोजित जागर मातृशक्तीचा सादरकर्ते सोमनाथ तरटे व रात्री आठ वाजता कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंदिराचे संस्थापक अध्यक्ष अशोक कानडे यांनी दिली. उद्योजक रविराज पाटील यांच्या हस्ते महाआरती झाली. यावेळी गोपाळराव सजनुळे, नवनाथ आंधळे गुरुजी, ओमप्रकाश तिवारी, स्मिताताई शितोळे, अमन तिवारी, लक्ष्मीकांत दंडवते, गणेश बाबर, लतिकाताई पवार, कटारिया आजी व मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते.
या कालावधीत दररोज पहाटे चार वाजता महाअभिषेक व महाआरती होणार आहे. दिव्य मंडप, देवीच्या गाभाऱ्यात केलेली आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट, डोळ्यांचे पारणे फेडणारी आकर्षक प्रकाश योजनामुळे मंदिर परिसरात नवचैतन्य निर्माण झाले आहे.