Prohibitory order of Collector Siddharam Salimath ः लोकसभा २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1), (3) नुसार जिल्ह्यात 20 मार्च ते दोन एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास मनाई असणार आहे. तसेच दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे. जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या, तसा ऐकवणारे उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे, सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल किंवा शांतता धोक्यात येईल, असे कोणतेही कृत्य करता येणार नाही. तसेच आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे. सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास व पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे.
सरकारी सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे. तसेच प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणूका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणूका हे कार्यक्रम, सभा घेण्यास अथवा मिरवणूका काढण्यास ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहायक पोलीस निरीक्षक यांची रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे.
शस्त्र बाळगण्यास मनाई
केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्चला लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली आहे. नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुक मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडल्या जावी यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करत आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार 16 मार्च ते 6 जूनपर्यंत, निवडणुकीच्या कालावधीमध्ये कोणत्याही व्यक्तीला शस्त्र परवान्यावरील शस्त्रे जवळ बाळगुन फिरण्यास सार्वजनिक ठिकाणी बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.
मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. मतदान सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. नगर जिल्ह्यातील मतदान होणाऱ्या केंद्रापासून 200 मीटर परिसरात मंडपे, दुकाने उभारणे, तसेच मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेंजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपक व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्र अधिकारी, सूक्ष्म निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या व्यतिरिक्त खासगी वाहन, संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी प्रचारास मनाई
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र दाखल करतांना आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावयाची आहे. जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी 13 मार्च ते 13 मे रोजीपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रचारास मनाई आदेश जारी केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश असणार आहे. उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या वाहनाच्या ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात, तसेच दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे,वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
सरकारी कार्यालय वापरास बंदी
नगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पाडण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये 16 मार्च ते 13 मे रोजीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उप विभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसिल कार्यालये तसेच शासकीय विश्रामगृह येथे कोणत्याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, आंदोलन करणे, उपोषण करणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे, कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
फेकन्यूजवर लक्ष राहणार
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कालावधीमध्ये उमेदवारांची प्रचारा दरम्यान बदनामी करणे, अफवा पसरविणे, द्वेषपुर्ण संदेश, खोटे संदेश तसेच प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडियाद्वारे प्रसारित होणाऱ्या फेकन्युजची माहिती जनतेकडून मिळण्यासाठी स्वतंत्र मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आला असुन त्याचा क्रमांक 9156438088 असा असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एका पत्राद्वारे दिली आहे. या क्रमांकावर जनतेकडून मिळालेल्या माहितीची नियंत्रण कक्षातील प्रभारी नियंत्रण अधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक (सायबर) यांच्या मदतीने माहितीची शहानिशा करुन आावश्यक ती कारवाई करावी,असेही पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे