Ayushman Health Card and PPE Kit ः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मागासवर्गीय लाभार्थ्यांशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून दिल्ली येथून संवाद साधला. तत्पूर्वी, प्रातिनिधीक स्वरूपात देशातील चार लाभार्थ्यांशी थेट संवाद साधत, त्यांना मिळालेल्या केंद्र सरकारच्या योजनेच्या लाभाविषयी प्रधानमंत्री यांनी माहिती जाणून घेतली. यामध्ये पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील तरूण नव-उद्योजक नरेश अवचर यांचा समावेश होता. प्रधानमंत्री यांनी नरेश अवचर यांच्या स्टार्ट-अप विषयी यावेळी माहिती जाणून घेतली. नगर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील वंचित मागासवर्गीय लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सवलतीचे व्यावसायिक व शैक्षणिक कर्ज, आयुष्यमान कार्ड व सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई कीटचे केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या सोबत सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या विविध योजनांचे जिल्ह्यातील लाभार्थी उपस्थित होते. राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ (NBCFDC), राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (NSFDC) आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ (NSKFDC) या तीन राष्ट्रीय महामंडळामार्फत अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग व सफाई कर्मचाऱ्यांपैकी एक लाख लाभार्थ्यांना सवलतीचे कर्ज , सफाई कामगारांसाठी आयुष्यमान हेल्थ कार्ड व पीपीई कीटचे देशभरात वाटप करण्यात आले. नगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना या योजनांच्या लाभांचे आज वितरण करण्यात आले. वंचित घटकांना सवलतीचे अर्थसहाय्य करण्यासाठी तयार करण्यात आलेले पीएम सुरज (SU-RAJ) या राष्ट्रीय पोर्टलचे उद्धघाटन ही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून देशातील ४७० जिल्ह्यातील ३ लाख लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संवाद साधतांना म्हणाले, “केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व वंचित वर्गाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम करण्यात आले आहे. विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून ७२० कोटी रूपयांचा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे”. वंचितांना देशाच्या विकासात भागीदार करण्यात आल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री यांनी लाभार्थी संवाद व भाषणापूर्वी नगर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, देशातील ३ कोटी महिलांना कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लखपती करण्याचा केंद्र शासनाचा उद्देश आहे. पीएम सूर्यघर योजनेमुळे येत्या काळात एक कोटी घरांना ३०० युनिट मोफत वीज मिळणार आहे. सर्वसामान्य माणसांना जीवनदान देण्याचे काम आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून झाले आहे. पीएम स्वनिधी योजनेतून सर्वसामान्य माणसाला स्वत∶च्या पायावर उभे करण्याचे काम झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थितांकडून हस्ते सवलतीच्या व्यावसायिक व शैक्षणिक कर्ज लाभाच्या पाच लाभार्थी, आयुष्यमान कार्डचे नऊ लाभार्थी व पीपीपी कीटचे १० सफाई कामगार लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व कीटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी केले.
प्रधानमंत्री मोदींचा नरेश अवचरशी रंगला संवाद
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधलेले जिल्ह्यातील तरूण नव उद्योजक नरेश साहेबराव अवचर (राळेगण थेरपाळ, ता.पारनेर) यांना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळाच्या असीम (ASIIM), डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल इनोव्हेशन अँड इनक्युबेशन मिशन योजनेत स्टार्ट-अप उद्योजक म्हणून ३० लाखांचे कर्ज मिळाले आहे. या वित्तीय सहाय्यातून त्यांनी जलजीवन ॲग्रो टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना केली असून या माध्यमातून शेतातील पाणी गळतीपासून संरक्षण देणारे ‘रबर टेल’ नावाचे उत्पादन तयार केले आहे. रबर टेल उत्पादनास पेटंट ही मिळाले आहे. प्रधानमंत्री यांनी नरेश अवचर यांच्याशी संवाद साधला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकरी ते उद्योजक हा आपला प्रवास अविश्वसनीय आहे. इथपर्यंतचा हा प्रवास कसा झाला? त्यावर नरेश अवचर याने माझे वडिल, आई, भाऊ यासह मी लहानपासून शेतात काम केले आहे. त्या अनुभवातून मला कंपनी स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली. आपणास केंद्र सरकारच्या कोण-कोणत्या योजनांना लाभ मिळाला आहे. या प्रधानमंत्र्यांच्या प्रश्नांवर अवचर याने मला आयुष्यमान कार्ड व असीम योजनेचा लाभ मिळाला आहे. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करता. आपण हे उत्पादन स्वत∶ तयार केले आहे का ? शेतकऱ्यांना आपण कशा प्रकारे मार्गदर्शन करतात? यावर अवचर याने भारत हा कृषी प्रधान देश आहे. कृषी क्षेत्रासाठी केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन आपली आर्थिक उन्नती करावी. अशा प्रकारे विविध प्रश्नांच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नरेश अवचर यांच्या यशाचा प्रवास जाणून घेतला.