Nagar News ः नगर अर्बन सहकारी बॅंक (बहुराज्यीय) गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेला कर्जदार उद्योजक अविनाश वैकर याने तपासी अधिकाऱ्यांनासमोर धक्कादायक माहितीची कबुली दिली आहे. मंजूर केलेल्या कर्जातून भाजपचे दिवंगत माजी खासदार तथा बॅंकेच तत्कालीन अध्यक्ष दिलीप गांधी यांना रोख स्वरूपात २० लाख रुपये, तर बॅंक अधिकारी घनश्याम ऊर्फ हेमंत अच्युत बल्लाळ याला कर्ज मंजुरीसाठी १० लाख रुपये दिले आहे. तशी कबुली कर्जदार वैकर याने दिली आहे. ही माहिती तपासी अधिकारी यांनी न्यायालयात सादर केली आहे. उद्योजक वैकर याने तपासी अधिकाऱ्यांसमोर दिलेली माहिती बॅंकिंग क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली आहे.
नगर अर्बन बॅंक गैरव्यवहारप्रकरणात अटक असलेला उद्योजक कर्जदार अविनाश वैकर याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. नगर अर्बन बॅंकेतील २९१ कोटी रुपयांचा कर्ज गैरव्यवहार आणि आर्थिक घोटाळ्याच तपास नगरच्या आर्थिक गुन्हे शाखा पोलीस करत आहेत. या गैरव्यवहारप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत बॅंकेचा माजी अध्यक्ष, तीन संचालकांसह दहा जणांना अटक केली आहे. अटकेत असलेला उद्योजक अविनाश वैकर याने बॅंकेकडून त्याच्या एव्हीआय इंजिनिअरींग वर्क्सच्या नावे व्यवसायासाठी २ कोटी ६७ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जापैकी काही रक्कम वैयक्तिक आणि काही रक्कम रोख स्वरूपात काढून कर्ज रकमेचा गैरव्यवहार केल्याचे आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
अविनाश वैकर याने मंजूर कर्जाच्या रकमेतून २० लाख रुपये तत्कालीन अध्यक्ष दिलीप गांधी यांना रोख स्वरूपात दिले. तसेच बॅंक अधिकारी घनश्याम बल्लाळ याला त्याच्या बॅंक खात्यावर सहा लाख रुपये आणि रोख स्वरूपात चार लाख रुपये दिल्याची कबुली तपासी अधिकाऱ्यांसमोर वैकर याने दिली आहे. याच मुद्याचा आधार घेत सरकारी वकील मंगेश दिवाणी यांनी पोलिसांच्यावतीने न्यायालयाकडे वैकर याच्या पोलीस कोठडीची वाढ केली. परंतु न्यायालयाने वैकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.