भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अहमदनगर काॅंग्रेसने गंभीर आराेप केले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कृतीवर काॅंग्रेस आक्षेप घेतला असून, भाजपचे हिंदूत्वाचे आणि देश प्रेमाचा बेगडी बुरखा फाटला आहे, असा टाेला काॅंग्रेसने लगावला आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे अहमदनगर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांविषयी केलेल्या वक्त्यावरून वाद सुरू आहेत. यातच काॅंग्रेसने त्यांच्यावर गंभीर आराेप केले आहे. भाजप कार्यकर्ते भारत मातेच्या घाेषणा देत असताना प्रदेशाध्यक्षांनी त्यांना थांबवून नरेंद्र माेदींच्या घाेषणा देण्यास लावण्याचा निंदनीय प्रकार केला. तसेच प्रभू श्रीरामांची घाेषणा सुरू असताना त्यांना मात्र ती द्यावाशी वाटली नाही, असा गंभीर आराेप काॅंग्रेसचे अहमदनगरचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत केला.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अहमदनगरमध्ये येऊन गेले. यावेळी पत्रकारांसंदर्भात त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची ऑडिओ क्लिप राज्यभर चांगलीच व्हायरल झाली. राज्यभर निषेध सुरू असताना त्यातच अहमदनगर शहर काँग्रेसने आता बावनकुळेंचा वादग्रस्त व्हिडिओ पत्रकार परिषदेत दाखवला. सोशल मीडियात तो चांगलाच व्हायरल होत आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करण्यापूर्वी काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये भारत माता, प्रभू श्रीराम, भारतीय संविधान उद्देशपत्रिकेचे फोटो झळकवत त्यांचा जयघोष काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी दंडाला काळ्या फिती बांधून भाजपच्या विकृत मनोवृत्तीचा काँग्रेसने निषेध केला.
भाजपला भारत माता, प्रभू श्रीरामांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदीच मोठे वाटतात.हे तर बोगस ढाब्यावर चला वाले…
नगरला आले असता प्रदेशाध्यक्ष आ.बावनकुळे यांनी भारत मातेच्या घोषणा थांबवून मोदींच्या घोषणा द्यायला लावल्या. अहमदनगर शहर काँग्रेसने हा व्हिडिओ उघड करून भाजपची पोलखोल केली. pic.twitter.com/ydCaBsBm8w
— Kiran Kale INC (@kirankale_INC) September 26, 2023
काँग्रेसने उघड केलेल्या व्हिडिओमध्ये प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मोदींचे फोटो असलेली पत्रके वाटताना दिसत असून मोदींच्या नावाच्या घोषणा उपस्थितांना द्यायला सांगत आहेत. यावेळी ‘भारत माता की जय’, अशी घोषणा देणाऱ्याला त्यांनी हात करून घोषणा बंद करायला सांगत मोदींची घोषणा द्यायला सांगत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा प्रकार अहमदनगर शहरात एकदा नव्हे तर, दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडल्याचे दोन स्वतंत्र व्हिडिओ काँग्रेसने उघड केले. हा भारत मातेचा, प्रभू श्रीरामांचा अवमान असून त्यामुळे तमाम हिंदूंसह सर्व भारतवासी देश प्रेमींच्या भावना दुखावल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
अहमदनगर शहर ही धार्मिक तेढ निर्माण करण्याची प्रयोगशाळा झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नीतेश राणे यांसारखे वेगवेगळे भाजपचे नेते अहमदनगर शहरात वारंवार येतात. हिंदूंच्या भावना दुखावतात. धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करतात. बाजारपेठेतील वातावरण दूषित करतात, असा देखील आराेप किरण काळे यांनी केला. पत्रकार परिषदेला मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, रतिलाल भंडारी, गणेश चव्हाण, अलतमश जरीवाला, अजय मिसाळ, किशोर कोतकर, फैयाज शेख, आकाश आल्हाट, आनंद जवंजाळ आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.