Manoj Jarange News ः मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीवर मनोज जरांगे ठाम असून, त्यांच्या आंदोलनाला काल जालना येथे हिंसक वळण लागले. मनोज जरांगे यांनी काल पत्रकार परिषदेत घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक भाषा वापरली. याचे पडसाद आज विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटले. आमदार आशिष शेलार यांनी सभागृहात मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाराष्ट्रात काहीतरी भयंकर घडत आहे. तसा कट रचला जात आहे. मनोज जरांगे यांना कोणाचे तरी पाठबळ आहे. याची चौकशी करा. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराष्ट्र बेचिराख करण्याच्या भूमिकेविरोधात या सदनात नाही बोलणार तर कुठे बोलणार, असा संतप्त प्रश्न आशिष शेलार यांनी सभागृहात उपस्थित केले.
आशिष शेलार म्हणाले, मनोज जरांगेंची भाषा अचानक एेकेरी झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत अपशब्द वापरले गेले. देवेंद्र फडणवीस यावर अजून काही तक्रार केलेली नाही. कायदा सुव्यवस्था, राज्य सरकार आणि भारताविरोधात फडणवीस कधी बोलत नाहीत. पण तरीही उपमुख्यमंत्र्यांना निपटून टाकण्याची भाषा केली जात आहे. हे चाललंय काय? मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा घटनाक्रम सरळ नाही. देवेंद्रजींच्या विरोधात पक्षाचे प्रवक्ते पोपटलाल सकाळी नऊ वाजता बोलले. भाजपला एका दिवसात संपवू असे म्हटले गेले. दुसऱ्या दिवशी मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्र्यांविरोधात भूमिका घेतली. याविरोधात कटकारस्थान आहे का? असा प्रश्न आशिष शेलार यांनी म्हटले.
महाराष्ट्रात पंतप्रधानांची सभा उधळून टाकू, असे म्हटले जात आहे. हा कटकारस्थानाचा भाग आहे. या विषयाची गंभीर नोंद घेतली पाहिजे, असेही आशिष शेलार म्हटले. या व्यक्तीला महत्त्व द्यायचं नाही. समाज आमच्याबरोबर आहे. हे सगळे घडवणारे मनोज जरांगे राहतात कुठे हे शोधले पाहिजे. तो कारखाना कोणाचा आहे, हे शोधले पाहिजे. तिथे आलेली दगडे कोणाच्या कारखान्यातील आहेत हे शोधले पाहिजे. या सगळ्यामागे एका व्यक्तीच्या समर्थनाची, पक्षाची राष्ट्रवादी काॅंग्रेसची असेल, एका कारखान्याच्या मालकाची असेल तर एसआयटी लावा, अशी मागणी आशिष शेलार यांनी यावेली केली.
यानंतर सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज तहकूब केले. कामकाज सुरळीत सुरू झाल्यानंतर या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा करण्यात आली.